कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराडची माणुसकी या ग्रुपचे सदस्य असणारे डॉ. सोळंकी आणि संदिप कोटणीस हे उंब्रज (ता. कराड) येथील मेडिकल कॅम्प संपवून कराडला येत होते. यावेळी उंब्रजच्या वेशीवर पोहचाताच त्यांच्यासमोर एक वृद्ध गृहस्थ रस्त्यांवर आडवे पडले होते. मात्र या रस्त्यांवर वेदनांनी कळवळत असणाऱ्या वृध्दाला डॉ. सोळंकीच्या माणुसकीचा आधार मिळाल्याची माहीती संदिप कोटणीस यांनी फोटो शेयर करून दिली आहे.
घटनास्थळावरील माहीती अशी, डॉ. सोळंकी हे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून मेडिकल कॅम्पला ठिकठिकाणी जात आहेत. गुरूवारीही ते उंब्रज येथे गेले होते. मेडिकल कॅम्प संपल्यानंतर ते कराडला येत असताना त्यांना एक वृध्द रस्त्यांवर वेदनांनी कळवळत असताना दिसून आला. डॉक्टरांनी लगेच गाडीतुन खाली उतरून त्या ग्रहस्थांची चौकशी केली. त्यांनी त्याला व्यवस्थित तपासले. तेव्हा त्या वृध्दाचे खुब्याचे हाड मोडले होते. लगेच अँबुलन्सला फोन लावला आणि उंब्रजला त्वरित येण्याचे निर्देश दिले.
तोपर्यंत डॉ. सोळंकी यांनी माणुसकी जपत आधी त्या गृहस्थाला उचलून रस्त्यांच्या बाजूला आडोशाला घेतले. पेशंटच्या वेदना कमी होण्यासाठी स्वतःकडची औषधे दिली. काही वेळातच त्या वृध्दाचा मुलगा तिथे पोहोचला. त्याला सगळी परिस्थिती डॉक्टरांनी समजावली, काय नेमके करायचे ह्याचे मार्गदर्शन दिले. तसेच पुढील तपासणीसाठी जाताना काही मदत लागल्यास स्वतःचा मोबाईल नंबर देखील दिला. कोणतीही अडचण असल्यास मला फोन कर हे बजावून सांगितले. सध्या जेव्हा करोनाच्या भीतीपोटी लोक एकमेकांशी बोलणे देखील टाळतायत तिथे या डॉक्टरांनी दाखवलेली माणुसकी वाघीणण्याजोगी आहे.