औरंगाबाद | गेल्या दीड वर्षापासून कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्यामुळे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. या ऑनलाईन शिक्षणात विद्यार्थ्यांना अनेक अडचणी निर्माण होतात. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी अँड्रॉइड मोबाईल नसतात तर काही ठिकाणी नेटवर्कची अडचण असते या अडचणी लक्षात घेऊन महापालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या परिसरात जाऊन शिक्षण देणार आहेत.
कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन दरम्यान दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शाळेमधून शिक्षण ऑनलाइन पद्धतीने दिले जात आहे पण महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेणारे बहुतांश विद्यार्थी हे सर्वसामान्य गरीब कुटुंबातील असल्यामुळे त्यांना ऑनलाईन शिक्षणासाठी अनेक अडचणी येत आहेत. हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी ‘शिक्षक आपल्या दारी’ हा उपक्रम महापालिकेने सुरू केला आहे. हा उपक्रम प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत उबाळे व सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार यांच्या संकल्पनेतून प्रियदर्शनी शाळा येथे सुरू करण्यात आला.
शिक्षणाधिकारी रामेश्वर थोरे यांचे या उपक्रमासाठी मार्गदर्शन लाभले. या उपक्रमात प्रतिभा गावंडे, शोभा पवार, रश्मी होनमुठे, सुनीता जोशी, स्वाती डिडोरे, मीरा मोरे हे पुढाकार घेत आहेत. शिक्षक त्यांच्या शाळेतील भागात जाऊन परिसरातील ओटे, मंदिरातील मोकळी जागा, किंवा सार्वजनिक ठिकाणी चार ते पाच मुलांना एकत्र करून विद्यार्थ्यांना कविता वाचन बाराखडी अंक ओळखीचा सराव घेणार आहेत.
ज्या विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांसाठी कृती पुस्तिका तयार करण्यात आली आहे. यामार्फत पंधरा दिवसासाठी विद्यार्थ्यांना एक कृतीपुस्तिका दिली जाईल. पंधरा दिवसात विद्यार्थ्यांनी ती सोडून पुन्हा शिक्षाकाकडे जमा करावी. त्यानंतर त्याला पुढील कृती पुस्तिका दिली जाईल.