कराड- पाटण मार्गावर दोन ट्रकच्या अपघातात चालक ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड-पाटण रस्त्यावर कराड तालुक्यातील मुंढे गावच्या हद्दीत जाधव ढाब्याजवळ उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने धडक देऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक ठार झाला. हा अपघात रविवारी दि. 13 रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. संजय कुंडलिक दोंदळे (वय 44, रा. अथणी, जि. बेळगाव) असे अपघातात ठार झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, चिपळूणहून बेंगलोरकडे संजय दोंदळे ट्रक घेऊन निघाले होते. कराड तालुक्यातील मुंढे गावच्या हद्दीत आल्यानंतर उभा असणार्‍या ट्रकला पाठीमागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली.

या अपघातात संजय दोंदळे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच कराड शहर अपघात विभागाचे प्रशांत जाधव व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी संजय दोंदळे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, उपचार सुरू असताना रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास अपघात विभागाचे पोलीस हवालदार प्रशांत जाधव करत आहेत.