कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलीस व होमगार्डला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. चैतन्य बाळासो ओव्हाळ (वय 25), पंकज संजय डुबल (वय 25), रोहीत शशिकांत चन्ने (वय 28), आफताब सिंकदर शेख (वय 22 सर्व रा. मळावार्ड ओगलेवाडी, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस हवालदार धिरज कोरडे व होमगार्ड पवार हे शनिवारी रात्री ओगलेवाडी, सैदापूर, विद्यानगर परिसरात पेट्रोलिंग करत असताना रात्री 12 च्या सुमारास ओगलेवाडी हद्दीतील रेल्वे स्टेशन रोडचे डाव्या बाजूस पाईप कंपनीचे बंद पडक्या घराबाहेर मोठमोठ्याने आराडाओरडा करत होते. त्यावेळी पोलीस हवालदार कोरडे व होमगार्ड पवर तेथे गेले असता चैतन्य ओव्हाळ, पंकज डुबल, रोहीत चन्ने, आफताब शेख हे चौघेजण दारू पित होते.
त्यावेळी कोरडे यांनी आम्ही पोलीस आहोत तुम्ही आरडाओरडा करू नका त्यामुळे शेजारी राहणार्या लोकांना त्रास होत आहे असे म्हणाले असता पंकज व रोहित या दोघांनी पोलिसांना तु इथून निघून जा तुला लय जड जाईल अशी धमकी दिली. तर चैतन्य याने पोलीस हवालदार कोरडे यांची कॉलर धरून त्यांना मारहाण केली. त्या झटापटीत कोरडे यांच्या हाताला मार लागला. तसेच आफताब शेख याने शिवीगाळ करून दमदाटी केली.
याप्रकरणी पोलीस हवालदार धिरज कोरडे यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे करीत आहेत.