हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील प्रगत देशांमध्ये गणना केली जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीला पावसाने (Dubai Rains) चांगलंच झोडपलं आहे. देशातील अनेक भागात पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका दुबई शहराला बसला आहे. दुबईतील रस्ते- विमानतळे पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे अनेक उड्डाणेही रद्द करावी लागली. UAE च्या आसपासच्या देशांमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झाला.UAE च्या शेजारील देश असलेल्या ओमानमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबद्दल लोकांना सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच त्याबाबत सार्वजनिक सेफ्टी एडवाइजरी जारी केली होती . दुबई आणि अबुधाबीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पाऊस (Dubai Rains) आणि गारपिटीचा इशारा UAE हवामान विभागाने दिला आहे. UAE च्या राष्ट्रीय हवामान केंद्राने (NCM) सांगितले की, मंगळवार दुपार ते बुधवार (17 एप्रिल) सकाळपर्यंत, खराब हवामानाची दुसरी लाट पश्चिमेकडील प्रदेशातून सुरू होऊन देशाच्या अनेक भागात पसरू शकते. हा अंदाज खरा ठरला आणि मुसळधार पावसाने दुबईला अक्षरशः झोडपून काढले.
Nope.
— anand mahindra (@anandmahindra) April 16, 2024
Not Mumbai.
Dubai…
pic.twitter.com/vvKx4WkKbm
रस्ते -विमानतळे पाण्याखाली – Dubai Rains
सध्याची परिस्थिती पाहता दुबईतील शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय वाहतूक बंद झाली आहे. दुबई विमानतळावरील अनेक उड्डाणे रद्द करण्यात आल्यामुळे भारत, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि अमेरिकेला जाणाऱ्या फ्लाईटना याचा मोठा फटका बसला आहे. दुबईतील पूरस्थिती किती भीषण आहे याबाबतचे विडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या विडिओ मध्ये संपूर्ण दुबई पाण्याखाली गेल्याचे दिसत आहे, गाड्या पाण्यावर तरंगताना दिसत आहेत. दुबईतील हा मुसळधार पाहून अनेकांना मुंबईची आठवण झाली आहे. कारण, मुंबई सुद्धा पावसात अशाच प्रकारे तुंबते.