हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड तालुक्यात देवी-देवतांच्या यात्रा सुरू आहेत. या यात्रांमध्ये किरकोळ कारणांवरून एकमेकांवर हल्ले करण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. अशीच एक घटना कराड तालुक्यातील अकाईचीवाडी येथे घटना घडली आहे. या ठिकाणी यात्रेमध्ये मुलांमध्ये झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बापाने एकावर कुऱ्हाडीने हल्ला केला. आणि या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. या प्रकरणी संबंधित हल्लेखोर बापावर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, कराड तालुक्यातील अकाईचीवाडी येथे नुकतीच यात्रा झाली. या यात्रेमध्ये गावातील विनोद माने याचा गावातीलच रघुनाथ चिखले यांच्या मुलाशी वाद झाला. दोघांतील झालेला वाद हा त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या नागरिकांनी सोडवला. मात्र, आपल्या मुलासोबत वाद घातल्याचा राग हा रघुनाथ चिखले यांच्या मनात होता. त्यांनी त्या रागाचा बदला घ्यायचे ठरवले. आणि वादानंतर चिडून जाऊन रघुनाथ चिखले हातात कुऱ्हाड घेऊन विनोदच्या घरासमोर गेले. त्यांनी विनोद माने याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. घराबाहेर ए तुला कुऱ्हाडीने तोडतोच, असे म्हंटले.
घराबाहेर कोण आपल्याला शिवीगाळ करतोय हे पाहण्यासाठी विनोद घरातून बाहेर आला असता रघुनाथ याने विनोदवर वार केला. अचानकपणे विनोदच्या अंगावर रघुनाथ आल्याने त्याने रघुनाथला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, या झटापटीत विनोदच्या हाताला गंभीर जखम झाली. तर यावेळी त्याच्या आई-वडिलांनाही रघुनाथ चिखले याने मारहाण केली. मारहाणीत कुऱ्हाडीच्या दांडक्याने व लाथाबुक्यांनी मारहाण केल्याने आई- वडिलांनाही मुक्कामार लागला असल्याची फिर्याद विनोदने पोलिसात दिली आहे.
या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी विनोद विश्वास माने याने कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विनोदच्या फिर्यादीनंतर हल्लेखोरांवर कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास हवालदार ज्ञानेश्वर राजे करत आहेत.