कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड येथे रविवारी लग्नानंतर लावण्यात आलेल्या फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत एका गोडाऊनसह दोन दुकानातील साहित्य जळाल्याची घटना घडली. शहरातील कोल्हापूर नाका परिसरात असलेल्या जाधव आर्केडमध्ये सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून दुकानात फटाके फुटल्याने त्यातील साहित्य जळून खाक झाले. यामध्ये साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कराड शहरातील कोल्हापूर नाका परिसरात रविवारी सायंकाळी एक विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. सायंकाळी लग्नात वधूवरांवर अक्षदा पडल्यानंतर काही युवकांनी आनंदाच्या भरात लग्न मंडपाच्या बाहेर रस्त्यावर फटाके वाजवले. यावेळी फटाक्याचा एक बॉक्स उलटला आणि त्यातील काही फटाके नजीकच असलेल्या जाधव आर्केड इमारतीमधील गोडाऊनसह अन्य दुकानांमध्ये जाऊन पडले. यानंतर फटाके फुटून गोडाऊनसह संबंधित दोन्ही दुकानांमध्ये आग लागली. घटना निदर्शनास येताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेऊन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले.
फटाक्यांमुळे लागलेली आग हि नजीकच असलेल्या भंगार दुकानातील साहित्यालाही आग लागली. त्यामुळे नागरिकांनी याबाबतची माहिती तत्काळ कराड पालिकेच्या अग्निशामक पथकाला दिली. त्यानंतर अग्निशामक पथक घटनास्थळी दाखल झाले. या पथकातीळ कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम करत सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत गोडाऊनमधील साहित्यासह फर्निचर व इतर दुकानांतील साहित्य जळून खाक झाले. या घटनेवेळी कोल्हापूर नाक्यावर बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. त्यामुळे उपमार्गावरील वाहतुकही काहीकाळ ठप्प झाली.