सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
तासगाव तालुक्यातील येळावी गावाला काल सायंकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान पाऊस व गारपिटीने चांगलेच झोडपले. ही गारपीट पंधरा मिनिटे सुरू होती. यामुळे आगाप द्राक्षबागांची छाटणी करून फुटलेल्या काड्यांना गारांचा मारा बसत जखमा झाल्याचे समजते. यामुळे या बागांना द्राक्षे न येण्याचा मोठा धोका आहे.
गारपिटीने शेकडो एकर क्षेत्र बाधीत झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. गेल्या वर्षी मार्च महिन्यात तासगाव तालुक्यात गारपीट व जोरदार पाऊस यामुळे २ हजार एकरमधील द्राक्षबागांना फटका बसला. द्राक्षबागांच्या काड्यांना गारांचा मारा बसल्यामुळे काड्यांना जखमा होत पाने तुटून गेली. यामुळे नुकसान झालेल्या द्राक्ष उत्पादकांवर दुबार छाटणी घेण्याची वेळ आली. मात्र दुबार छाटणी केलेल्या या बागांना माल आला नाही.
आता जखमी काड्यांना माल येईल याची खात्री नसल्यामुळे शेतकरी हबकला आहे. आगाप बागांवर पुन्हा दुबार छाटणीची टांगती तलवार आहे. प्रशासनाने पंचनामे करून मदत करावी अशी मागणी होत आहे. दिवसभर उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना एकीकडे गारपिटीमुळे गारवा अनुभवायास मिळाला तर दुसरीकडे द्राक्ष बागांचे नुकसान झाल्याचे चित्र आहे.