नवी दिल्ली । सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या निषेधार्थ देशभरातील बँका पुन्हा संपावर जाणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) च्या केंद्रीय समितीने या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. 23 आणि 24 फेब्रुवारीला हा संप असेल. यावेळी देशभरातील सर्व सरकारी आणि खासगी बँकांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने 15 आणि 16 मार्च 2021 रोजी दोन सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाला विरोध केला. यानंतर, बँकिंग कायदे (दुरुस्ती) विधेयक 2021 च्या निषेधार्थ 16 आणि 17 डिसेंबर 2021 रोजी संप करण्यात आला.
‘देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी केला जात आहे संप’
संघटनेचे सरचिटणीस सीएच वेंकटचलम यांनी सर्व संबंधित बँक असोसिएशन आणि सभासदांना एक परिपत्रक जारी करून ही माहिती देत या संपात सहभागी होण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार, हा लढा केवळ लोकांचे जीवन आणि उपजीविका वाचवण्यासाठी नाही तर देशाची अर्थव्यवस्था वाचवण्यासाठीही केला जात आहे.
गेल्या संपामुळे चेक क्लिअरन्ससह अनेक कामे रखडली होती
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणाच्या सरकारच्या योजनेला विरोध करण्यासाठी बँक संघटनांनी गेल्या महिन्यात 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप केला होता. त्यानंतर बँक संपाचा परिणाम स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), पंजाब नॅशनल बँक (PNB), सेंट्रल बँक आणि आरबीएल बँकेच्या कामकाजावर झाला. यामुळे चेक क्लिअरन्स, फंड ट्रान्सफर, डेबिट कार्ड यासंबंधीची कामीही रखडली होती.