औरंगाबाद – मागील 40 ते 50दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारल्यामुळे बाहेरगावी जाणाऱ्या एसटी बसेस बंदच आहेत. मात्र, आता काही कर्मचारी कामावर हजर होत असून, त्यांच्या मदतीने काही मार्गांवर एसटी बसेस प्रवाशांना घेऊन धावू लागल्या आहेत. काल मंगळवारी औरंगाबाद विभागात विविध मार्गांवर 40 बसेस धावल्या. या बसेसने 59 फेऱ्या केल्या तर आतापर्यंत 620 कर्मचारी आपल्या कर्तव्यावर हजर झाले आहेत.
एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचारी 7 नोव्हेंबर पासून संपावर गेले आहेत. या संपामुळे एसटी बस सेवेवर प्रचंड परिणाम झालेला आहे. काल औरंगाबाद पुणे मार्गावर 15 खाजगी शिवशाही चालवण्यात आल्या, त्यातून 532 प्रवाशांनी प्रवास केला. त्याचप्रमाणे नाशिक मार्गावर सहा शिवशाही पाठवण्यात आल्या. तर सिडको डेपोतून जालना मार्गावर आठ, मध्यवर्ती बस स्थानकाच्या डेपोतून औरंगाबाद-कन्नड मार्गावर दोन बसने चार फेऱ्या, औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर तीन बसने सहा, तसेच कन्नड आगारातून कन्नड-औरंगाबाद मार्गावर तीन बसने सहा, गंगापूर आगारातून गंगापूर-महालगाव एका बसने दोन, तर सोयगाव डेपोतून सोयगाव-बनोटी, सोयगाव-गोलेगाव या मार्गावर प्रत्येकी एक बसने दोन फेऱ्या केल्या.
औरंगाबाद विभागातील पैठण, सिल्लोड आणि वैजापूर डेपोतून मात्र एकही बस निघाली नाही. काल दिवसभरात 40 बसणे 59 फेर्या केल्या त्यात 1 हजार 543 प्रवास यांनी प्रवासाचा लाभ घेतला.