आपटा….सोन्यासारखा जपू या !!

दसरा स्पेशल | प्रा. व्ही.एन.शिंदे

आपटा हे अत्यंत महत्त्वाचे झाड. ते अस्सल भारतीय झाड आहे. भारत, बांग्लादेश, पाकिस्तान, चीन, श्रीलंका या देशात प्रामुख्याने ते आढळते. बोहिनिया रेसिमोसा हे याचे वैज्ञानिक नाव. रेसिमोसा म्हणजे तुऱ्यासारखे फुल येणारे झाड. दोन वनस्पतीशास्त्रज्ञ जॉन आणि कॉस्पर बोहिन या जुळ्या भावंडांच्या नावावरून याला बोहिनिया हे नाव मिळाले. जुळी पाने असणारी कांचन, आपटा ही सर्व झाडे या बोहिनिया कुटुंबात समाविष्ट आहेत. त्याला बर्मिज सिल्क ऑर्किड, बिडी लीफ ट्री असेही म्हणतात. संस्कृतमध्ये आपट्याला वनराज, चंद्रक, आम्लपत्रक, युग्मपत्र, मालुकापर्ण, कुद्दाली, अश्मंतक अशी अनेक नावे आहेत. अर्थात ही सर्व नावे त्या वृक्षाच्या विविध गुणधर्मांवरून आलेली आहेत. अश्मंतक म्हणजे दगडाचा अंत करणारा. या झाडाच्या मुळाआड दगड आला, खडक आला तर त्या खडकाला फोडून जातात. या झाडाखाली असणारे खडक भुगा होऊन जातात. त्याला हिंदीमध्ये अष्टा, कचनाल, घिला, झिंझोरी अशा नावाने ओळखले जाते. गुजरातीत असुंद्रो, बंगालीमध्ये बनराज, बनराजी, कन्नडमध्ये औप्टा, बन्ने, आरेपत्री, तमिळमध्ये अराईवृत्ता, आरेका, तेलगूमध्ये आरी, आरे अशी नावे आहेत. शततारका नक्षत्राचा आणि कुंभ राशीचा आपटा हा आराध्यवृक्ष आहे. या झाडाला कितीही तोडले तरी खोडापासून पुन्हा फांद्या फुटतात. जुन्या ग्रंथात ही झाडे गावाच्या सीमेवर आणि शेताच्या बांधावर लावावीत असे लिहीले आहे. बांधावर असणारी झाडे मालकी ठरवण्यासाठीच्या खूणा म्हणून ठेवली जातात. या झाडांचा आकार लहान असतो. त्यामुळे या झाडांच्या सावलीमुळे पिकावर कोणताही परिणाम होत नाही. उलट या झाडाच्या पानामुळे जमिनीची सुपिकता वाढते. या झाडाच्या सालीपासून दोरखंड बनवले जातात. जुन्या काळात या झाडांची पाने गुजरातेत बिड्यासाठी वापरली जात. धन्वंतरी निघन्टूमध्ये या झाडाचे आणखी औषधी उपयोग दिले आहेत.

‘अष्मंतक कषायस्तु हिम: पित्तकफापह:l मधुर: शीतसंग्राही दाहतृष्णा प्रमेहजित्ll’

पित्त आणि कफदोषावर गुणकारी, दाह, तृष्णा आणि प्रमेह यावर विजय मिळवणारा, असा हा वृक्ष आहे. आणखी एक श्लोक सांगतो, ‘आपट्याचा वृक्ष महावृक्ष आहे. तो महादोषांचे निवारण करतो. इष्टदेवतेचे दर्शन घडवतो. शत्रूचा विनाश घडवतो.

या लाकडाचा जळण म्हणूनही वापर करतात. या जळणातून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळते. या लाकडांच्या राखेतून लोह, कॅल्शियम, पोटॅश, मॅग्नेशियम, गंधक, सोडियम, स्फुरद अशी अनेक मूल्रदव्यांची संयुगे असतात. त्यामुळे ही राख शेतीसाठी चांगले खत म्हणून काम करते. आपटा हा मूतखड्यावरही उपयोगी पडतो. त्या अर्थानेही तो त्याचे अश्मंतक हे नाव सार्थ करतो. लघवी करताना जळजळ होत असेल तर पानाचा रस काढून दूध आणि साखर मिसळून घेण्याचा सल्ला देतात. मूत्राशयाच्या विकारावर आपट्याच्या शेगांचाही वापर केला जातो. गंडमाळा, गंडरोग, गालगुंडावरील उपचारासाठी आपट्याची साल वापरली जाते. जखमांच्या व्रणावर आपट्याची साल बांधली असता, व्रण जातात. यातील जाणकार बाळंतपण, पोटाचे विकार, विंचू दंश यावरही आपट्याचे विविध भाग वापरून उपाय करतात. पाने, फुले, शेंगा, मुळ्या, साल या सर्व घटकांचे औषधी उपयोग आहेत. आपट्याच्या बिंयांचे चूर्ण गाईच्या तूपात मिसळून कीटक चावलेल्या ठिकाणी लावतात. आपट्याच्या झाडापासून क्वचित डिंक मिळतो. हा डिंकही पौष्टिक असतो. या झाडाच्या सालीपासून टॅनीन मिळवले जाते. त्याचा उपयोग रंग बनवण्यासाठी आणि कातडी कमावण्याच्या उद्योगात केला जातो.

आपट्याच्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग होतो. मात्र आज या झाडाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. या झाडाला आपण जपले पाहिजे. आपले पान सोने म्हणून वाटायला देणाऱ्या या झाडाला आपणही सोन्यासारखे जपायला हवे. या झाडाबद्दल सविस्तर लेख ब्लॉगवर यथावकाश प्रसिद्ध करणार आहे. मात्र दसऱ्याच्या शुभेच्छा देताना एक विनंतीही, शक्य असेल तेथे आपट्याची झाडे लावू या! दोन वर्षांनतर आपल्या आपट्याची झाडाची पाने सोने म्हणून देवू या!

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like