हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर “द्वारका एक्स्प्रेस वे”(Dwarka Expressway) बांधकाम प्रकरणी कॅगने गंभीर आरोप लावले आहेत. मात्र द्वारका एक्सप्रेस वेमध्ये कोणताही घोटाळा झालेला नाही, असे म्हणत नितीन गडकरींनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, जर द्वारका एक्सप्रेसमध्ये घोटाळा झाला असेल तर तो विरोधकांनी सिद्ध करावा” असे आवाहन नितीन गडकरी यांनी केले आहे. नुकत्याच, कॅगने प्रसिद्ध केलेल्या अहवालानंतर द्वारका एक्सप्रेस घोटाळा प्रकरण चर्चेत आले आहे. दरम्यान, या घोटाळा प्रकरणी गडकरी यांच्यावर टीका होत असताना रविवारी त्यांनी द्वारका एक्सप्रेसवेच्या नव्या बांधकाम प्रकल्पाचा व्हिडिओ ट्विट केला आहे. या प्रकल्पाला गडकरी यांनी अभियांत्रिकी चमत्कार म्हटले आहे.
Marvel of Engineering: The Dwarka Expressway! A State-of-the-Art Journey into the Future 🛣#DwarkaExpressway #PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/Qhgd77WatW
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) August 20, 2023
अभियांत्रिकी चमत्कारसध्या द्वारका एक्सप्रेस (Dwarka Expressway) घोटाळा प्रकरणी नितीन गडकरी वादाच्या अडकले आहेत. मात्र, “देशातील अभियांत्रिकी चमत्कार असलेल्या द्वारका द्रुतगती महामार्गाच्या बांधणीत १२ टक्के पैशांची बचत झाली आहे. त्यामुळे महामार्गाच्या बांधणीत भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध करून दाखवा” असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले आहे. मुख्य म्हणजे, यानंतर त्यांनी द्वारका एक्सप्रेसच्या नवीन बांधकामाचा प्रकल्प व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या प्रकल्पाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी “अभियांत्रिकी चमत्कार, द्वारका एक्सप्रेसवे.. भविष्यातील अत्याधुनिक प्रवास” असे म्हणले आहे.
कसा आहे द्वारका एक्सप्रेस वे- (Dwarka Expressway)
या व्हिडीओनुसार, द्वारका एक्सप्रेस वे हा चार-पॅकेजचा महामार्ग आहे. ज्याची लेन-रुंदी 563 किमी आहे. तसेच, नवीन प्रकल्पानुसार एक्सप्रेस रस्ता राष्ट्रीय महामार्ग 8 वरील शिवमूर्तीपासून सुरू होऊन गुरुग्राममधील खेरकी दौला टोल प्लाझा येथे संपत आहे. मुख्य म्हणजे, हा भारतातील पहिला प्रकल्प आहे ज्यासाठी 1,200 झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दिल्ली आणि हरियाणामधील कनेक्टिव्हिटीमध्ये लक्षणीय सुधारणा होणार आहे. व्हिडिओनुसार, द्वारका ते मानेसर प्रवासाची वेळ 15 मिनिटे, मानेसर ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ 20 मिनिटे, द्वारका ते सिंघू सीमा 25 मिनिटे आणि मानेसर ते सिंघू सीमेपर्यंत ४५ मिनिटांचे वेळ लागणार आहे.
दरम्यान, कॅगकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालात नितिन गडकरी यांच्यावर द्वारका एक्सप्रेस वे (Dwarka Expressway) प्रकल्पामध्ये घोटाळा केल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. कॅगने आपल्या अहवालात, द्वारका एक्सप्रेसच्या प्रति किमीसाठी 250 कोटी रुपये खर्च झाल्याचे म्हणले आहे. त्यानुसार, द्वारका एक्सप्रेस वे च्या बांधकामासाठी नितीन गडकरी यांनी सर्वात जास्त पैसा खर्च केल्याचे कॅगने म्हटले आहे. मात्र आता गडकरी यांच्याकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत. तसेच जर घोटाळा झाला असेल तर तो सिद्ध करावा असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात गडकरी यांच्या अडचणीत वाढ होईल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.