हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे रविवारी रात्री जाळपोळ अन् दंगलीची घटना घडली आणि सातारा जिल्हा हादरून गेला. या घटनेनंतर कराडसह पुसेसावळी v त्या लगत शहरातील वातावरण सकाळच्या टप्प्यात तणावपूर्ण बनले होते. दरम्यान, कराड शहरात मध्यरात्रीच पोलिस ठाण्यात अल्पसंख्याक समाजाची बैठक घेऊन DYSP अमोल ठाकूर यांच्यासह पोलिसांनी शांततेचे आवाहन केले.
कराड येथील प्रार्थनास्थळावर सकाळी अल्पसंख्याक बांधव एकत्रित आले. तसेच त्यांच्यावतीने सर्वांनाच शांततेचे आवाहन करण्यात आल्यानंतर दुपारी 12 वाजल्यानंतर सर्व तणाव निवळून जनजीवन पूर्वपदावर आले. दरम्यान, शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हल्ल्याच्या घटनेतील जखमींवर येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुसेसावळी येथील घटनेनंतर कराडसह परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता. ज्याच्याकडून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली, त्या संबंधितांचे फेक अकाऊंट तयार करून त्यावरून ही पोस्ट व्हायरल करण्यात आली आहे. त्याप्रकरणी गुन्हा दाखल करून घ्यावा, अशी मागणी येथील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात आली. त्यानंतर मध्यरात्री 2 वाजताच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी समाजबांधवांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. त्यानुसार उपस्थित अल्पसंख्याक बांधव तेथून घरी परतले.
दरम्यान, काल सकाळी पुन्हा येथील प्रार्थनास्थळामध्ये अल्पसंख्याक बांधव मोठ्या संख्येने जमले होते. त्यामुळे शहरातील बाजारपेठ परिसरात थोडा तणाव होता. समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन या प्रकरणातील मुख्य संबंधित संशयितांना अटक करावी, अशी मागणी करण्याचे निवेदन देण्यात येईल, असे सांगण्यात आले. त्यानंतर निवेदन देण्यासाठी काहीजण साताऱ्याला रवाना झाल्यावर तेथील उपस्थित अल्पसंख्याक बांधवांनी समाजाला शांततेचे आवाहन केले. दुपारी बारानंतर तणाव निवळला. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी काल रात्रीपासूनच पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर, तासगाव येथील पोलिस उपअधीक्षक सचिन थोरबोले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, तालुका पोलिस निरीक्षक विजय पाटील यांनी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.