Satara News : पुसेसावळी दंगलप्रकरणी BJP च्या ‘या’ नेत्यावर गुन्हा दाखल करा!; मृतदेह न घेता जमावाकडून मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानंतर काल रविवारी रात्री उशीरा पुसेसावळीत दंगल उसळली. यात संतप्त जमावाने प्रार्थना स्थळावर केलेल्या हल्ल्यात ११ जण गंभीर जखमी झाले. तर त्यातील एकाचा मृत्यू झाला असून नुरहसन शिकलगार (वय २७, पुसेसावळी) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, आज सोमवारी पुसेसावळी दंगलप्रकरणात मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह ताब्यात घेण्यास मुस्लिम समाजाने नकार दिला. यावेळी त्यांनी थेट भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली.

आज जिल्हा रुग्णालय परिसरात ठिय्या मारला. याबाबत पुरवणी तक्रार देण्यासाठी मुस्लिम समाजाच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षकांची भेट घेतली. भेटीत झालेल्या चर्चेअंती पुरवणी जबाबात भाजपचे पावसकर यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याने त्या युवकाचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

दिवसभर गावात तणावपूर्ण वातावरण होते. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास शिकलगारचा मृतदेह पुसेसावळीत आणण्यात आला. त्यावेळीही मोठा पोलिस बंदोबस्त होता. जखमी सरफराज बागवान यांच्या फिर्यादीवरून औंध पोलिसात तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असणाऱ्या पुसेसावळी येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी जाळपोळीची घटना काल रविवारी रात्री घडली होती. यामुळे पुसेसावळी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.