टीम, HELLO महाराष्ट्र | लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला. त्यानंतर भारतात नाही तर भारताबाहेरही गणेशोत्सव मोठ्या भक्ती भावाने साजरा होऊ लागला. पण वर्षानुवर्षे या गणेशोत्सवामध्ये अनेक बदल होऊ लागले. यामुळे आपल्या पर्यावरणाची खूप हानी होण्यास सुरुवात झाली. म्हणून आता काही वर्षांपासून अनेक नागरिक आणि सार्वजनिक गणेश मंडळे पर्यावरण पूरक गणपतीची स्थापना करत आहेत. त्यामुळे आता काही मूर्तिकारांनी पर्यावरण पूरक गणपती बाजारात विक्रीसाठी आणले आहेत.
३ पिढ्यांचा वारसा असणारे मोरे कुटुंबीयांची चौथी पिढी आता गणेशमूर्ती बनवण्याची परंपरा कायम ठेवत आहे. ब्रिटिशकाळात कै. हरिभाऊ त्र्यंबक मोरे यांनी कलेची आवड म्हणून आपल्या भाजीपाल्याच्या व्यवसायासोबतच गोदावरीच्या काळ्या मातीपासून श्री गणेशाची मूर्ती बनविण्यास सुरुवात केली होती. पर्यावरणाचा योग्य समतोल राखला जावा म्हणून या कुटुंबाने शाडूमातीचा सोबतच अंकुर बीजनिर्मिती व तुरटीमिश्रित श्री गणेशाची मूर्ती मंगलमूर्ती बनवण्यास सुरुवात केली आहे.
मोरे यांनी मागील १० वर्षांपासून गणेश मूर्तीमध्ये एक नवीन प्रयोग सुरू केला आहे. त्यात शाडूमातीमध्ये प्रत्येक मूर्तीत बेल, कारले व अर्जुन यांची ८ ते १० बी टाकण्यास सुरुवात केली. त्यामुळे घरी अथवा नदीपात्रात श्री गणेशाच्या मूर्तीचे विसर्जन केल्यानंतर त्यामध्ये असलेले बी नदीलगत कुठेतरी जाऊन रुजेल व त्यापासून सुंदर अशा रोपट्याचे निर्मिती होईल व पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल, हा त्यांचा त्यामागील मूळ हेतू आहे.
मोरे यांचा मुलगा मयूर हा अंकुर बीजनिर्मिती गणेशमूर्तीसोबत गेल्या वर्षभरापासून नवीन संशोधन करीत आहे. त्याने श्री गणेशाच्या मूर्तीमध्ये तुरटीचा वापरण्यास सुरुवात केली आहे. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाल्याचं मोरे यांनी सांगितलं. त्यामध्ये 3 किलो मूर्तीला 85 मिलिग्राम तुटीचे प्रमाण त्यांनी निश्चित केले आणि त्यामुळे ३ हजार ५०० लिटर पाणी शुद्ध होते. तसेच ही मूर्ती शाडूची असल्याने ती पाण्यात लवकर विरघळण्यास मदत होते आणि पाण्याचे प्रदूषण होत नाही. त्यामुळे या गणपतीत जर गणेश भक्तांनी शाडूच्या मातीपासून बनवलेल्या गणपतीची स्थापना केली तर पर्यावरणाचा ह्रास टळेल.