सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात महत्वाचा असलेलया कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केली. या कारवाईनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारखान्यावरील कारवाईनंतर जिल्ह्यातील कोरेगाव वाई, खंडाळा, खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. त्यामुळे ईडीने केलेल्या कारवाईच्या विरोधात आज कोरेगाव येथे तहसीलदार कार्यालय ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मोर्चा काढला.
या मोर्चात शेतकाऱ्यांसोबत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने आणि बहुतांश राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान शेतकऱयांनी तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदनही दिले आहे. मात्र, शुक्रवारी काढलेल्या मोर्चाबाबत शहरात उलट सुलट चर्चा सुरु होती. हा मोर्चाचे म्हणजे शेतकऱ्यांचा नसून राष्ट्रवादी पुरस्कृत असल्याचे बोलले जात होते.
कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर शुगर मिल या कारखान्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर जिल्ह्यातील कोरेगाव वाई,खंडाळा,खटाव या तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी यांचा उसाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या काळजीने ते हवालदिल झाले आहेत. यावर्षी सुमारे 22 हजार हेक्टर क्षेत्रात उसाची नोंद या कारखान्यामध्ये झाली असून येवढ्या उसाचे करायचे काय? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे कारखान्याप्रश्नी शासनाने लवकर निर्णय घ्यावा व शेतकरी वर्गाचे नुकसान करू नये, अशी मागणी शेतकरी व कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, कोरेगाव तहसील कार्यालय परिसरात मोर्चाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.