हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते हसन मुश्रीफ यांच्या घरी आज ईडीने पुन्हा एकदा धाड टाकली. आज सकाळी सात वाजता ईडीचे अधिकारी मुश्रीफ यांच्या कागल येथील घरी पोचलेत. विशेष म्हणजे गेल्या २ महिन्यात ईडीची ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
संताजी घोरपडे साखर कारखान्यातील घोटाळ्याप्रकरणी मुश्रीफ यांच्या घरावर धाड पडली आहे. यामधील कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरु आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर आयकर विभाग आणि ईडीने छापेमारी सुद्धा केली होती. आता पुन्हा एकदा ईडीने याप्रकरणावरून मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुश्रीफ यांच्या घरावर ईडीने केलेल्या छापेमारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हंटल कि हे सगळं धक्कादायक आहे. कितीवेळा हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली जाणार आहे. हसन मुश्रीफ यांना त्रास द्यायचा आणि काहीही करून अडचणीत आणायचं हाच यामागचं अजेंडा आहे असं म्हणत त्यानी या छापेमारीचा निषेध केला आहे.