अधिकाऱ्यांचा इगो अन् बेजबाबदार लोकप्रतिनिधी

औरंगाबादमध्ये लाॅकडाऊनवरून राजकारण..!

 

 

औरंगाबाद । शहरात कोरोना रुग्णांची संख्या आणि रुग्णांच्या मृत्यूचा आकडा प्रचंड वेगाने वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी बेजबाबदारपणे वागत आहेत आणि वरिष्ठ अधिकारी एकमेकांना जुमानत नसल्याने कोरोनावर मात कशी करायची, असा प्रश्न औरंगाबादकराना पडला आहे. अधिकाऱ्यांचा इगो आणि राजकारण्यांचा बेजबाबदारपणामुळे शहराचे काय होईल आणि शहरवासीयांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल का? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

शहरात आजपासून लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी घेतला होता. मात्र या निर्णयाला काही भाजप, मनसे, एमआयएम आणि व्यापाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचा विरोध होता.

मंगळवारी रात्री हा निर्णय झाल्यानंतर औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील भलतेच खूश झाले. त्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही आणि भररस्त्यात कार्यकर्त्यांसह जल्लोष साजरा केला. हारतुरे घालून घेतले. मात्र, हे करताना कोरोनाबाबतच्या नियमांची पूर्णतः पायमल्ली झाली. याची जाणीव खासदारांना नसावी का, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

त्यामुळे आता एकीकडे लॉकडाऊन करू नका, असं सांगत प्रशासनाला धारेवर धरणाऱ्या आणि रस्त्यावर नियमांची पायमल्ली करणाऱ्या खासदारावर कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसेनेच्या नेत्यांनी केली आहे. लोकांना कोरोनाबाबतचे नियम सांगायचे आणि आपण मात्र खुशाल नियम मोडायचे अशांवर कारवाई करण्यासाठी भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत पोलीस ठाणे गाठले. इतकेच नाही तर अधिकारीही बेजबाबदार असल्याची टीका केली. अधिकारी, लोकप्रतिनिधी हे दोघेही आपल्या मनाप्रमाणे वागत आहेत हे आता हळूहळू सर्वसामान्य लोकांनाही कळू लागले आहे.

You might also like