औरंगाबाद | जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात फळ, भाजीपाला आडत बाजारात खरेदी-विक्रीसाठी होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी महानगरपालिकेने किरकोळ भाजी विक्रीचे विकेंद्रीकरण केले आहे. शहरातील नऊ झोनमध्ये ४० ठिकाणी सकाळी ६ ते ११ च्या दरम्यान मंडई भरविण्यात येणार आहे.
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना जाधववाडी येथे मात्र फळ, भाजी खरेदी-विक्रीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. एकाच वेळी येथे १० ते १५ हजार नागरिक एकत्र येतात व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. शेतकरी व किरकोळ विक्रेते हे बाजार समितीचे कर्मचारी व खासगी सुरक्षा रक्षकांना दाद देत नाही. यामुळे येथे वाढणारी गर्दी जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी बनली होती. शिवाय कोरोना संसर्ग वाढविण्यास येथील मंडई कारणीभूत ठरत असल्याचा ठपकाही येण्याची शक्यता होती.
आडत बाजारातील गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सोमवारी २९ रोजी सकाळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, महापालिकेचे अधिकारी, बाजार समितीचे सभापती, सचिव, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, आडत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन बैठक घेतली. किरकोळ विक्रेते व ग्राहकांमुळे आडत बाजारात प्रचंड गर्दी होत असल्याने किरकोळ बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय झाला आहे.
सायंकाळी महापालिका प्रशासनाने नवीन आदेश काढून शहरातील नऊ झोनमधील ४० ठिकाणी किरकोळ फळ व भाजीपाला विक्रीला परवानगी दिली. याची अंमलबजावणी आज ३१ मार्चपासून करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना आता आडत बाजारात जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनच्या काळात घराच्या परिसरात भाजी मंडईमध्ये भाजीपाला मिळेल. हातगाडीवाल्यांनी फिरती विक्री करावी.
महापालिका प्रशासनाने आदेशात म्हटले आहे की, हातगाडीवाल्यांनी एकाच ठिकाणी थांबू नये. अंतर्गत रस्त्यांवर फिरून त्यांनी फळे, भाजीपाला विकावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन हवे; तसेच विक्रेत्यांनी मास्क घालणे व सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.