हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यासारख्या अनुभवी नेतृत्वाची पक्षाला गरज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात पुन्हा यायला हवं’ एकेकाळचे महाराष्ट्रातील खडसेंच्या नाराज टीममधील एक, पण सध्या भाजपच्या दिल्लीच्या राजकारणातील सूत्र हालवणाऱ्या विनोद तावडे यांनी केलेलं हे जाहीर वक्तव्य. देवेंद्र फडणवीसांशी बिघडलेले संबंध, पक्षातून साईडलाईन केलं जात असल्याच्या घटना आणि भोसरी भूखंड प्रकरणामुळे बांधले गेलेले हात या सगळ्याला कंटाळून २३ ऑक्टोंबर २०२० ला त्यांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश झाला. शरद पवारांनी नाथाभाऊंच्या राजकारणाला योग्य तो मान देत त्यांना विधानपरिषदेवर घेत राजकीय पुनर्वसन केलं. भाजपात आपल्यावर कसा अन्याय झाला? याचा कित्ता गिरवायची एकही संधी यानंतर नाथाभाऊंनी सोडली नाही. तुम्ही ईडी लावली तर मी सिडी लावेल, असं छातीठोकपणे भाजपला सांगणाऱ्या याच नाथाभाऊंनी ऐन लोकसभेच्या तोंडावर पुन्हा भाजपात जायचा निर्णय घेतलाय. येत्या १५ दिवसांच्या आत त्यांचा दिल्लीत अधिकृत पक्षप्रवेश होेईल हे तर आता कन्फर्मय. भाजपाचं उत्तर महाराष्ट्राचं बिघडलेलं गणित पुन्हा सुटसुटीत होण्यासाठी नाथाभाऊंची मोठी मदत होईलच पण या सगळ्यात एका प्र्श्नाचा पिंगा स्थानिक कार्यकर्त्यांना पडलाय तो म्हणजे गिरीशभाऊ की नाथाभाऊ? एकाच पक्षात असल्यापासून नाथाभाऊ आणि गिरीशभाऊ यांचं वैर सगळ्यांना ठाऊक आहेच. खडसे राष्ट्रवादीच्या वळचणीला गेल्यापासून जिल्ह्यातील तयार झालेली नेतृत्वाची पोकळी महाजनांनी भरून काढली. त्यामुळे तीन वर्षांनी पुन्हा घरवापसी करणाऱ्या नाथाभाऊंना जिल्ह्याच्या राजकारणात खरंच स्कोप मिळेल का? लोकसभेच्या तोंडावर होणाऱ्या या घरवापसीचा नेमका कसा अर्थ काढायचा? नाथाभाऊ महाजनांच्या राजकराणाला पुन्हा बॅकफूटला टाकतील का? भाजपवर आग ओकणाऱ्या नाथाभाऊंना पक्षात घेऊन तावडेंनी नेमकं काय साध्य केलंय? हेच आपण समजून घेऊया..
राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून नाथाभाऊ यंदा लोकसभा लढणार अशी चर्चा होती. मात्र तिकीटवाटपाचे सोपस्कार जवळ आल्यावर तब्येतीचं कारण पुढे करत त्यांनी निवडणुकीतून काढता पाय घेतला. दुसरीकडं भाजपात असलेल्या खडसेंच्या सूनबाई विद्यमान खासदार रक्षा खडसे यांंचं भाजप तिकीट कापणार, असं बोललं जात असताना रावेरमधून त्यांनी तिकीट रिपीट केलं. त्यामुळे आता प्रत्यक्षात सूनेच्या विरोधातच प्रचार करण्याची वेळ नाथाभाऊंवर आल्याने त्यांच्यासाठी ही गोष्ट मन खाणारी होती. दुसरीकडे नाथाभाऊंच्या मदतीशिवाय जळगाव जिल्ह्याच्या दोन जागा जिंकणं भाजपलाा थोडं जिकीरीचं होतं. यामागचं कारण म्हणजे खडसेंच्या पाठीशी असणारं लेवा मराठा समाजाचं मतदान. जिल्ह्यात निर्णायक मतदान लेवा मराठा समाजाचं मानलं जातं. हा समाज ज्या उमेदवाराच्या पाठिशी उभा राहतो त्यासाठी निवडणुक प्लसमध्ये जाते. खडसे या समाजातून येत असल्याने आणि या समाजाचा खडसेंवर विश्वास असल्याने ही व्होटबँक काही केल्या भाजपसाठी महत्वाची होती. त्यात भोसरी भूखंड प्रकरणात नाथाभाऊ पुन्हा अडकणार अशा चर्चाही मीडियामध्ये येऊ लागल्या. खरी मेख इथेच होती. सूनेच्या विरोधात राजकारण करणं, ईडीची टांगती तलवार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा जिल्ह्यातील अगदीच मूठभर ताकद आणि भाजपच्या जुण्या जाणत्या नेत्यांकडून सातत्यानं पक्षात येण्याची घातली जाणारी गळ या सगळ्यांचा विचार करुन नाथाभाऊंच्या डोक्यात गणितं जुळू लागली. अगदीच अनपेक्षितपणे त्यांची दिल्लीवारी झाली.. याात भाजप प्रदेशाअध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत त्यांची भैट झाली. दिल्लीत बरीच खलबतं झाल्यानंतर आपण पुन्हा घरवापसी करणार असल्याच्या माध्यमांमध्ये सुरु असलेल्या चर्चांना नाथाभाऊंनी ग्रिन सिग्नल दिला. येत्या १५ दिवसांच्या आत त्यांचा दिल्लीत हा पक्षप्रवेश पारही पडेल. पण यामुेळे जिल्याची स्थानिक पातळीवरची याचा मोठा इम्पॅक्ट पडताना दिसू शकतो.
यातला सगळ्यात पहिला काळजीचा विषय असणार आहे तो म्हणजे गिरीश महाजनांसोबत (Girish Mahajan) असणाऱ्या वैराचं काय? दोन वेगळ्या पक्षात असताना या दोन नेत्यांमधलंं भांडण चालून जाणारं होतं. मात्र आता नाथाभाऊ पुन्हा भाजपात येणार म्हणजे महाजनांनी घेतलेला स्पेस काही प्रमाणात का होईना कमी होणार. त्यात संकटमोचक म्हणून ओळख असणाऱ्या गिरीशभाऊंनी खडसेंच्या पक्षप्रवेशाला विरोध केलाय. महाजनांचे कट्टर समर्थक समजले जाणारे चाळिसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनाही खडसेंच्या घरवापसीला विरोध आहे. स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला खडसेंमुळेे बळ मिळण्याची शक्यता आहे. यामागचं कारण म्हणजे खडसेंच्या पाठिशी उभा असणारा लेवा समाज. पण खडसेंसोबत फिरावं तर गिरीशभाऊ नाराज आणि गिरिशभाऊंसोबत फिरावं तर नाथाभाऊ नाराज अशी गोची स्थानिक पदाधिकाऱ्यांची होऊन बसलीय. त्यात नाथाभाऊ राष्ट्रवादीत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते जिल्हा पातळीवर महाजनांनी आपली माणसं पेरली आहेत. पक्ष संघटना, फंड त्यांच्याकडे आहे. त्यामुळे उमेदवारांना, नेत्यांना गिरीशभाऊंना दुखावता येणार नाही, हे तर स्पष्ट आहे. मग अशा वेळेस खडसेंचा या सगळ्या निवडणुकीत नेमका काय रोल असेल हे अजून गुलदस्त्याच आहे. मुळात नाथाभाऊ प्रचारासाठी फिरताना दिसतील का? याबद्धलही अजून क्लिअर कट बोलता येणार नाही.
गिरीशभाऊ स्ट्राँग होऊन जळगावात नाथाभाऊ मायनसमध्ये जाण्याचं आणखीन एक कारण म्हणजे त्यांची राजकीय संभ्रामवस्था नाथाभाऊ एकाच वेळेस सध्या दोन दगडांवर पाय ठेवताना दिसतायत. मुलगी रोहिणी खडसे यांनी आपण राष्ट्रवादीसोबतच राहणार असल्याचं क्लिअर केलं आहे. त्यामुळे ईडीच्या दबावाला बळी पडून त्यांनी हा निर्णय घेतलाय असंं नकळत परसेप्शन तयार होतंय. आपली सून रक्षा खडसेे यांची खासदारकी वाचावी, म्हणून देखील त्यांना नाईलाजानं हा निर्णय घ्यावा लागत असल्याचं बोललं जातंय. मूळात त्यांची राष्ट्रवादीत कोणती नाराजी नव्हती. राज्य पातळीवरील भाजप नेत्यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी अगदी स्वखुशीने राष्ट्रवादीची वाट धरली होती. आपल्या ३० वर्षांच्या काळातील जिल्ह्यातील पक्षावरचा होल्ड देखील गमवावा लागला. अन् तो नकळत गिरीश महाजनांकडेे शिफ्ट झाला. त्यामुळे सध्या नाथाभाऊ घरवापसी करण्यामागे जे काही कारण सांगतायत त्याला काहीच मोठा बेस दिसत नाहीयेे. भाजपात येणारे नाथाभाऊ नंतर मुलीच्या राजकारणासाठी पुन्हा राष्ट्रवादीत जाणार का? असाही प्रश्न स्वाभाविकपणे विचारला जाऊ शकतो. एकूणच काय तर नाथाभाऊंची गोंधळात टाकणाऱ्या राजकीय भूमिकेमुळे तेे महाजनांपेक्षा जिल्ह्याच्या राजकारणाच बॅकफूटला पडू शकतात… रक्षा खडसे यांना पक्षांतर्गत विरोध वाढतो आहे. मतदार संघात फिरताना रक्षा खडसे एकनाथ खडसेंना घेऊन फिरतात असा आरोप भाजप नेत्यांनी केल्याचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. रक्षा खडसेंची उमेदवारी रद्द करण्यासाठी भाजपच्याच काही नेत्यांनी दिल्लीत फिल्डिंगही लावली होती. मात्र आता नाथाभाऊ भाजपात आल्याने रक्षा खडसेंना ताकद मिळालीय परंतु मुलगी रोहिणी खडसेला राष्ट्रवादीत ठेऊन एकनाथ खडसेंना नक्की काय साध्य करायचं आहे. हे गोडबंगाल काही केल्या समजून येत नाहीये.
थोडक्यात काय तर जळगाव, रावेर लोकसभेला नाथाभाऊ आपल्या गोटात असतील तर निवडणुक आपल्या कंट्रोल मध्ये येईल, लेवा मराठा समाजाचा मिळू शकणारा पाठिंबा रक्षा खडसे यांची पक्की झालेेली उमेदवारी आणि फडणवीसांचंच राज्यात सगळं काही चालत नाही, असा मॅसेज केंद्रानं नाथाभाऊंच्या प्रवेशातून दिलाय. त्यामुळे आता एकेकाळी महाराष्ट्र भाजपात नाराज असणारं खडसे, तावडे आणि मुंडे हे त्रिकूट एक्टिव्ह झालंय. तावडे यांनी दिल्लीत जम बसवल्यानंतर आपल्या नाराज सहकाऱ्यांना म्हणजे पंकजा मुडेंना खासदारकी देऊन तर खडसेंना पुन्हा पक्षात घेऊन फडणवीसांनाही अप्रत्यक्ष शह दिलाय. त्यामुळे जळगावच्या राजकारणावरची आपली पकड गिरीशभाऊ अशीच कायम ठेवणार की दिल्लीच्या कृपार्शिवादाने नाथाभाऊ महाजनांना इंगा दाखवणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हला कमेंट करून नक्की सांगा….