कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेच्यावतीने साखर क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरीबद्दल दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण आज पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे ‘व्ही.एस.आय.’च्या प्रांगणात उत्साहात करण्यात आले. याप्रसंगी सन 2021-22 या गळीत हंगामातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्सला प्रदान करण्यात करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी केंद्रीय कृषीमंत्री खासदार शरद पवार यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते कारखान्याचे संस्थापक डॉ. सुरेश भोसले व श्री. विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
याप्रसंगी व्यासपीठावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी जलसंपदामंत्री आ. जयंत पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. बबनराव शिंदे, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, हर्षवर्धन पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘व्ही.एस.आय.’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.
साखर क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दरवर्षी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) या संस्थेद्वारे पुरस्कार जाहीर केले जातात. यंदाच्या पुरस्कारांची घोषणा संस्थेतर्फे नुकतीच करण्यात आली होती. यामध्ये संस्थापक डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जयवंत शुगर्सने आपली नाममुद्रा उमटवत राज्यातील सर्वोत्कृष्ट डिस्टीलरीचा पुरस्कार प्राप्त केला. आज झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ‘व्ही.एस.आय.’ कडून जयवंत शुगर्सला ‘कै. रावसाहेबदादा पवार सर्वोत्कृष्ट डिस्टीलरी पुरस्कार’ प्रदान करुन गौरविण्यात आले. मानचिन्ह व प्रशस्तिपत्र तसेच एक लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे, जनरल मॅनेजर एन. एम. बंडगर, डिस्टीलरी इन्चार्ज व्ही. जी. म्हसवडे, प्रशासकीय अधिकारी आर. टी. सिरसाट, श्रीकृष्ण वानखेडे, वैभव मोहिते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.