हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन एक महिना उलटला असल्याने राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय लवकरच होईल. यासाठी पुढचा आठवडा वाट पहावी लागणार नाही,असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे आज दुपारी एक वाजता नवी दिल्लीत दाखल झाले. त्यांच्या दिल्लीवारीमुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांच्याअगोदरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत दाखल झाले आहेत.
दोन्ही नेत्यांकडून आज राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबतच्या बैठकांमध्ये चर्चा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर सोमवारी मंत्रिमंडळ विस्ताराची घोषणा केली जाईल. मात्र, दोघांच्या दिल्ली वारीनंतर काय होणार? याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची सहावी दिल्ली वारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीत दाखल झाले. त्यांची दिल्लीवारी ही सहावी आहे. आतापर्यंत मुख्यमंत्री शिंदेनी केलेल्या दिल्लीवारीपैकी आजची त्यांची केंद्रीयमंत्र्यां सोबतची होणारी भेट ही महत्वाची मानली जात आहे. कारण भेटींत झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील नावांवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.