हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात वातावरण चांगलेच तापले आहे. आज विरोधकांकडून सीमाभागाबाबत ठराव मांडण्याची मागणी करण्यात आल्यानंतर याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत प्रतिक्रिया दिली. सीमाप्रश्नाबाबत आपण उद्याच विधिमंडळात ठराव मांडणार आहोत आणि मंजूरही केला जाईल, असे शिंदे यांनी म्हंटले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मी वीर बाल दिनाच्या कार्यक्रमासाठी केंद्राच्या निमंत्रणावरुन दिल्लीला आलो होतो. मुख्यमंत्री म्हणाले की, सुप्रीम कोर्टात हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करत कायदा व सुवस्थेचा प्रश्न होऊ नये, याच्या सूचना केल्या आहेत.
हा विषय 60 वर्षांपासूनचा आहे. असे असताना कोर्टातील प्रकरणावर परिणाम होऊ नये याची काळजी घ्यायला हव्या. जे आज बोलत आहेत त्यांनी सीमाभागातील लोकांच्या योजना बंद केल्या. टीका करणाऱ्यांनी माहिती घेऊन बोलावं. आम्ही पूर्णपणे सीमावासियांसाठी खंबीर आहोत. उद्या याबाबत आम्ही ठराव आणणार आहोत. दरम्यान आज शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सीमाभाग प्रश्नी ठराव घेण्याची मागणी केली.