हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे गटात आणि ठाकरे गटात दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद निर्माण होत आहे. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केल्यामुळे राजकिय वर्तुळात नव्या वादाची ठिणगी पेटली आहे. गुरुवारी विधानसभेच्या निवडणुकांत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी एकनाथ शिंदे राजस्थानला गेले होते. याठिकाणी गेल्यावर प्रचारावेळी एकनाथ शिंदे यांचा ‘हिंदूहृदय सम्राट’ असा उल्लेख असलेला पोस्टर लावण्यात आला. या पोस्टरवरूनच आता महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची तुलना थेट बाळासाहेब ठाकरेंशी करण्यात आल्याचे देखील म्हटले जात आहे.
सध्या सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘हिंदूहृदय सम्राट’ असा उल्लेख केलेला पोस्टर प्रचंड व्हायरल होत आहे. या पोस्टर च्या माध्यमातून एकनाथ शिंदेंची तुलना बाळासाहेब ठाकरेंशी करण्यात येत आहे. यावरूनच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. शिंदेंवर टीका करत राऊतांनी म्हणलं आहे की, “आम्ही इतके वर्षे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं काम केलं. त्यांचा संघर्ष पाहिला हिंदुत्वासाठी, त्यांनी सत्तेसाठी कधी बेईमानी केली नाही. आता सत्तेसाठी बेईमानी करणाऱ्यांना हिंदुहृदय सम्राट म्हणण्याची नवी परंपरा नव्या हिंदुत्वात सुरु झाली असेल तर पहावं लागेल”
त्याचबरोबर, “एकनाथ शिंदे हे हिंदूहृदय सम्राट असतील तर त्यांनी हिंदुहृदय सम्राट म्हणून काय असं महान कार्य केलं आहे. हे आम्हाला सगळ्यांना पाहावं लागेल” अशा बोचऱ्या शब्दात राऊतांनी शिंदेंना सुनावलं आहे. दरम्यान, राजस्थानमध्ये भाजपचे उमेदवार बालमुकुंदाचार्य यांच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी त्यांच्या फोटोचा मोठा पोस्टर लावण्यात आला होता. या पोस्टरवरच शिंदे यांचा उल्लेख हिंदू हृदयसम्राट असा करण्यात आला. यावरूनच आता ठाकरे गटाकडून शिंदे गटावर जोरदार टीका केली जात आहे.