हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपुरात आज आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. “मी 24 तास जनतेसाठी काम करणारा मुख्यमंत्री आहे. महाराष्ट्रातील जनतेचा सेवक असल्याच्या भावनेने मला हे काम करायच आहे. पंढरपुरात वारीच्या अनुषंगाने नियोजन करण्यासाठी व वारकऱ्याच्या सोयीसाठी पंढरपुरचा उत्तम दर्जाचा विकास आरखडा तयार करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या आहेत. त्यानुसार वारकऱ्याच्या सुविधेसाठी यंदापासून 5 कोटी निधीची तरतूद करत आहे,” अशी मोठी घोषणा शिंदे यांनी केली.
शासकीय महापूजा संपन्न झाल्यानंतर त्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातील नवे सरकार हे जनतेचे आणि सर्वसामान्यांचे आहे. आपल्या राज्यातील अनेक लोकांमध्ये बुद्धिमत्तेचे प्रमाण अधिक आहे. याचा उपयोग आपण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी करू. पंढरपूरचा विशेष विकास आराखडा बनवणार आहे. त्यातून पंढरपुरात दरवर्षी येणाऱ्या वारकऱ्यांना चांगल्या सुविधाही मिळणार आहेत. त्यातून सरकारचीही प्रतिमा वाढली पाहिजे.
शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके असल्याने ती समान वेगाने धावायला हवीत. दोन्ही चाके गतीने धावली तरच राज्याच्या विकासालाही गती येईल. पंढरपुर हे आपल्यासारख्या गोरगरिबांचे दैवत आहे. 10 लाखांपेक्षा अधिक लोक दिसत आहेत. या वारकऱ्यांसाठी स्वच्छ निरोगी वातावरण असले पाहिजे. त्यासाठी पंढरपूरच्या विकासासाठी एक विशेष विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले.