हा विजय मनोज जरांगेचाच!! मराठा आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे वक्तव्यं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आज विधिमंडळामध्ये मराठा आरक्षण विधेयक (Maratha Reservation Bill) सादर करण्यात आले. हे विधेयक एक मताने मंजूर देखील करण्यात आले. त्यामुळेच आता मराठा समाजाला शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण (Maratha Reservation) असणार आहे. या आरक्षणामुळे मराठा तरुणांसाठी नोकरी आणि शैक्षणिक क्षेत्रात विविध संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच ही आरक्षण मराठा समाजाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. दरम्यान, मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे.

एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, “मी बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, मी शब्द पाळतो. त्यामुळे लोक माझ्यावर विश्वास ठेवतात. मी मागचा विषय काढणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी उभ्या केलेल्या आंदोलनाचा हा विजय आहे. मराठ्यांच्या इच्छापुर्तीचा हा दिवस आहे. सर्व समाजासाठी आमची समान भूमिका आहे. ना कोणावर अन्याय ना कोणाला धक्का दिला आहे”

मात्र यावर मनोज जरांगे पाटील यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली आहे. “हे विधेयक मंजूर करणं आमच्या हिताचं नाही, आमचं म्हणणं आहे. आमच्या हक्काचं आरक्षण द्या. सगे सोयरेची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे. जे पाहिजे ते आम्ही मिळवणारच आहोत. आधीही सांगितलं होतं की हे नाकारण्याचा काही कारणच नाही” असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आज मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून आज विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते. या अधिवेशनामध्येच राज्य मागासवर्गीय आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून स्पष्ट झाले की, राज्यामध्ये मराठे सामाजिक व आर्थिकद़ृष्ट्या मागास आहेत.