हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ठाण्यातील विवियाना मॉल मध्ये ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. या प्रकरणी आव्हाडांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘जितेंद्र आव्हाड यांच्यावर पोलिसांनी जी कायदेशीर कारवाई केली ती कायदेशीर आहे. त्यात कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नाही किंवा हे कोणी मुद्दामहूनही केलेलं नाही’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हंटले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून भंडारा जिल्ह्याचा दौरा केला जात आहे. दौऱ्यावेळी त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, ‘आमचे सरकार म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सरकार राज्यात आहे. ते सर्वप्रथम कशाला प्राधान्य देत असेल तर ते कामाला प्राधान्य देत आहे. अडीच वर्षांत जी विकास कामे रखडली होती त्यांना मागील तीन ते चार महिन्यांमध्ये आम्ही चालना देण्याचे काम केले आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांमध्ये जात असल्याचा आरोप आमच्यावर केला जात आहे. आरोप करणारे करतच राहतात. पण कोणताही प्रकल्प लगेचच राज्याबाहेर जात नाही. आमचं सरकार विकासाला आणि उद्योगाला चालना देणारे सरकार आहे. येत्या काळात काही मोठे प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहेत, असे शिंदे यांनी म्हंटले.