हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | माजी मंत्री रामदास कदम यांनी आज आपल्या शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते तर माझ्यावर ही वेळच आली नसती असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. या सर्व घडामोडींबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना विचारलं असता त्यांनी सूचक संकेत दिले आहेत.
मी आता रामदास कदम यांच्याशी बोलणार आहे. आमदार योगेश कदम पहिल्या दिवसापासून आमच्यासोबत आहे याबद्दल सर्वांना माहिती आहे. रामदास कदम यांच्या शुभेच्छा आधीपासूनच आमच्यासोबत होत्या. आम्ही जी भूमिका जी घेतली आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आम्ही म्हणतोय. आमचं हे ध्येय अनेकांना मान्य आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले.
दरम्यान, रामदास कदम यांनी खरमरीत पत्र लिहीत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शिवसेना प्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी शिवसेना नेते पदी नियुक्ती केली होती. मात्र, शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळालं. मागील ३ वर्षापासून तोंड दाबून बुक्क्यांचा मार मी सहन करित आहे. ज्या ज्या वेळी शिवसेनेवरती संकटे आली त्या वाईट काळामध्ये माझा संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत युती करु नका, ती बाळासाहेबांच्या विचाराची प्रतारणा होईल. अशी आपल्याला विनंती केली होती. पण आपण त्याही वेळी माझं ऐकलं नाही याचेही दुःख माझ्या मनामध्ये आहे. शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज “शिवसेना नेता ” या पदाचा राजीनामा देत आहे असे म्हणत रामदास कदम यांनी नेतेपदाचा राजीनामा दिला.