सातारा | सातारा जिल्हा बॅंकेत आम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवलेली नाही. जिल्हा बॅंकेची निवडणूक स्थानिक पातळीवरची होती. सांगलीत जिल्हा बॅंकेचे निकाल चांगले लागले आहेत. शशिकांत शिंदेनी निवडणूक गांभीर्याने घेणे गरजेचे होते, असे मत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केले आहे.
महाबळेश्वर येथे युवा काॅंग्रेसचं राज्यव्यापी शिबिर संपन्न झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील, पार्थ पवार हेही उपस्थित होते. यावेळी शरद पवार म्हणाले, “सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मतानं पराभव झाला. मात्र, मी अद्याप त्यांच्या पराभवाचं कारण काय असू शकेल याच्या खोलात गेलेलो नाही. पण त्यांनी ही निवडणूक गांभीर्यानं घ्यायला हवी होती.”
राज्यात पुढे महापालिका, नगरपालिकेच्या निवडणुका असल्याने युवकांना जागृत करण गरजेचे आहे. त्याचबरोबर पुढच्या तीन-चार महिन्यात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होऊ शकतात, असे संकेतही पवार यांनी यावेळी दिले.