सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट च्या निवडणुकीत माझी उपसरपंच संतोष उर्फ बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखालील श्री सेवागिरी “रयत” संघटनेने विरोधकांचा 4 -2 ने धुव्वा उडवत सत्तांतर घडवून आणले. राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व माजी पं. स. सदस्य मोहनराव जाधव यांच्या ताब्यात असलेले श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले. तर शिवसेनेचे आ. महेश शिंदे व माजी उपसरपंच रणधीर जाधव यांच्या नेृत्वाखालील सेवागिरी जनशक्ती संघटनेला केवळ एका समाधान मानावे लागले.
श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे निवडणूकीसाठी अर्ज माघारीनंतर 6 विश्वस्तांच्या जागांसाठी तिन्ही गटाचे उमेदवार 18 व अपक्ष 5 असे एकूण 23 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे राहिले होते. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टसाठी रविवारी 7 हजार 51 मतदारांपैकी 5 हजार 8 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावून 71.02 टक्के मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किरण जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून सर्वच प्रभागातील आकडेवारी समोर आल्यानंतर श्री सेवागिरी “रयत” संघटनाच बाजी मारणार हे निश्चित झाले होते.
13 व्या फेरीअखेर रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, गौरव जाधव, डॉ. सुरेश जाधव, संतोष वाघ सहाव्या जागेसाठी रयतच्याच गणेश जाधव व सचिन देशमुख यांच्यात लढत सुरू आहे. रयतच्या उमेदवारांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना 150- 200 च्या फरकाच्या मतदारांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवले. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विद्यमान चेअरमन व मोहनराव जाधव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विद्यमान विश्वस्त योगेश देशमुख यांना पराभवाचा सामना करावा लागला.
मतमोजणीत पहिल्या फेरीतच श्री सेवागिरी “रयत” संघटनेच्या उमेदवारांनी लीड घेतले होते. त्यामुळे श्री सेवागिरी “रयत” संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाची तर श्री सेवागिरी नागरिक संघटना व श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण होते. पुढील प्रत्येक फेरीचे निकाल बाहेर येऊ लागले यामध्ये ही आघाडी वाढवून 150-200 मतांच्या पुढे गेली होती. मतमोजणी झाल्यानंतर श्री सेवागिरी “रयत” संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली. याच वेळी डॉल्बीच्या दणदणाटामध्ये कार्यकर्ते बेधुंद होऊन नाचत होते.
विजयी उमेदवारांना मिळालेली मते पुढील प्रमाणे
रयत संघटना – संतोष जाधव(2139) गौरव जाधव(1802) संतोष वाघ(1767) सचिन देशमुख(1726)
नागरिक संघटना – डॉ. सुरेश जाधव(1763)
जनशक्ती संघटना – रणधीर जाधव (2171)