कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून शासकीय विलीनीकरणासह इतर मागण्यांसाठी गेल्या आठ दिवसांपासून राज्यभर कामबंद आंदोलन केले जात आहे. अजूनही तोडगा न निघाल्याने कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत. कराड तालुक्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही सपाट सहभाग घेत कामबंद ठेवले आहे. दरम्यान त्यांनी आज पोतराज बनत राज्य सरकारवर आसूड ओढत निषेध नोंदवला.
कराड येथे एसटी कर्मच्रायांच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारवर निशाणा साधला जात आहे. एकीकडे एसटी महामंडळाचे कर्मचारी संघटना आणि शिष्टमंडळाच्या परिवहन मंत्र्यांशी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. तर दुसरीकडे महामंडळाच्यावतीने कामावर न येणाऱ्या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले जात आहे. दरम्यान कराड येथे सुरु असलेल्या आंदोलनावेळी आज कर्मच्रायांनी पोतराजाचा वेष परिधान करीत राज्य सरकारच्या विरोधात आसूड उगारून निषेध नोंदविला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी पोतराजाच्या आसुडाद्वारे राज्य सरकारवर हल्लाबोल केला. तसेच भजन करीत टाळ, मृदूंग, पकवाज, हलगी वाजवत राज्य सरकारच्या विरोधात गाऱ्हाणेही मांडले. अशा प्रकारे दररोज विविध प्रकारे एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने कराड इथे आंदोलन करीत राज्य सरकारचा निषेध केला जात आहे.