हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील राज्यसभेच्या जागेसाठी भाजपाकडून एकनाथ खडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सुत्रांची माहिती आहे. आपल्याला विधानसभेतच आपल्याला रस होता, आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही अशी तीव्र नाराजीची भावना एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा दर्शवली. गेल्या वर्षी विधानसभेसाठी भाजपने एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नव्हती. विधानसभा लढवण्याची पूर्ण तयारी केलेल्या खडसेंनी विधानसभेसाठी आपला अर्जही दाखल केला होता. पण भाजपाने त्यांना उमदेवारी देण्यापासून अखेरपर्यंत डावलले.
मात्र, ऐनवेळी नाथाभाऊंसारख्या माणसाचे राजकीय मूल्य पाहता त्यांच्या कन्या रोहिणी खडसेंना यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, या निवडणुकीत रोहिणी खडसेंचा पराभव झाला. यानंतर भाजपशी निष्ठावान राहून सुद्धा आपलं तिकीट कापल्याची खंत खडसे यांनी त्यानंतर कित्येक वेळा बोलून दाखवली.
दरम्यान, आता खडसेंना राज्यसभेची उमेदवारी दिली गेली असल्याची चर्चा होत असताना. माध्यमांना राज्यसभेच्या उमेदवारीबाबत प्रतिक्रिया देत खडसेंनी आपलं जुनंच दुखणं पुन्हा मांडलं. ”उमेदवारीबाबत आपला अनुभव चांगला नाही. विधानसभेत रुची होती, तेव्हा उमेदवारी दिली नाही, आता राज्यसभेची उमेदवारी देऊन उपयोग नाही. होईल तेव्हा पाहू, ते काही खरे नाही, असे स्पष्ट मत एकनाथ खडसेंनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
येत्या २५ मार्चला राज्यसभेच्या ५५ जागांपैकी महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ७ जागांवर निवडणूक होत आहे. या जागांवरील सध्याच्या सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, माजिद मेमन निवृत्त होत आहेत. त्यामुळे, मेमन यांच्याऐवजी फौजिया खान यांना संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निश्चित केल्याचे समजते. तर, राज्यातील भाजप नेतृत्वाने उदयनराजे भोसलेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. तसेच, नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचे पुनर्वसन म्हणौन त्यांना राज्यसभेत पाठविण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. यासोबतच, रामदास आठवलेंची खासदारकी कायम ठेवण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.