औरंगाबाद – जिल्ह्यातील दहिगाव शिवारात शनिवारी एका व्यक्तीचा दोन तुकडे करून फेकून देण्यात आलेला मृतदेह आढळला होता. त्याची ओळख पटविण्यासह या खुनाचा उलगडा करण्यात पिशोर पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्यानेच त्या व्यक्तीचा काटा काढण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले. संदीप बाळा मोकासे (वय 35, रा. शफेपूर, पिशोर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
दहिगाव शिवारात एका कॅरिबॅगमध्ये व खताच्या गोणीत भरून रस्त्यापासून दीडशे फुटावर लांब टाकलेला एक अर्धवट मृतदेह काहींना आढळला होता. पिशोर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तो ताब्यात घेतला. शनिवारी रात्रभर सपोनि. कोमल शिंदे व सहकाऱ्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मृतदेहाचा कमरेखालील भाग मिळाला नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद घाटीत नेला असता, मारहाण करून, गळा कापून खून करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. सपोनि शिंदे यांनी तपासचक्रे फिरवून कर्मचाऱ्यांच्या टीम तयार करून तपासकामी पाठविले. यात शफेपूर येथील संदीप बाळा मोकासे हा दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या पत्नीचे गावातील सुनील सावजी हरणकाळ व शशिकांत ऊर्फ (छोटू) नारायण मोकासे यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मृताच्या उसाच्या शेतात पाहणी केल्यानंतर तेथे पोटाच्या आतडीचा काही भाग मिळाला. यानंतर मृत हा संदीप बाळा मोकासे असल्याचे निष्पन्न झाले. हा तपास सपोनि. कोमल शिंदे, उपनिरीक्षक विजय आहेर, उपनिरीक्षक विजय जाधव व स्टाफ, सहा. फौजदार सोनाजी तुपे, माधव जरारे आदींनी केला.
सुनील सावजी हरणकाळ व शशिकांत नारायण मोकासे यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र पोलिसी खाक्या दाखवताच पत्नीसोबतच्या अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने त्याला शेतात नेऊन धारदार शस्त्राने डोक्यात मारून गळा कापल्याचे सांगितले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे कमरेपासून दोन तुकडे केले. धडाचा भाग कॅरिबॅगमध्ये बांधून गोणीत टाकून दहिगाव शिवारात टाकला. कमरेखालील भाग जवळच गट नंबर 95 मधील विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले. आरोपींनी संदीप मोकासेचा शरीराचा अर्धा भाग कापून विहिरीत फेकला होता. पोलिसांनी त्या विहिरीतून गळाच्या साहाय्याने पांढऱ्या रंगाची गोणी काढली. यात कमरेखालचा भाग कुजलेल्या अवस्थेत मिळून आला. नाचनवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय राजभोज यांनी जागेवरच उत्तरीय तपासणी केली. दोनच दिवसांत पिशोर पोलिसांना गुन्ह्याचा उलगडा करण्यात यश मिळाले. आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता, 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.