उद्योजकाला भामट्याने लावला ६० हजाराचा चुना; एमआयडीसी वाळूज पोलिसांत गुन्हा दाखल

औरंगाबाद | कंपनीसाठी लागणा-या प्लास्टिकच्या कच्च्या मालाचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून भामट्याने उद्योजकाला ६० हजारांचा गंडा घातला. हा प्रकार २४ मे रोजी घडला. प्रशांत ताटे उर्फ राजेंद्र चौधरी (रा.जळगाव) असे भामट्याचे नाव आहे.

दिनेश कचरुदास कापकर (वय ४५, रा. नंदनवन कॉलनी, विशालनगर) यांची मॅट प्रॉडक्शन समिक्षा नावाची कंपनी आहे. त्यांना कंपनीत उत्पादनासाठी कच्च्या मालाची आवश्यकता होती. त्यासाठी त्यांनी मित्र आबा पाटील व अनिल पाटील यांना २४ मे रोजी मोबाईलवर संपर्क  साधून याबाबत कळविले. त्यांनी कापकर यांना प्रशांत ताटे (रा. जळगाव) याच्याकडे माल मिळेल असे सांगितले. तसेच पाटील यांनी कापकर यांना ताटेचा मोबाईल क्रमांक पाठविला. त्यावर कापकर यांनी संपर्क साधून कंपनीच्या प्रॉडक्ट कामी प्लास्टीकच्या मटेरियलबाबत विचारणा करून दोन टन प्लास्टीक मटेरियलसाठी ८० हजार रूपये देण्याचे ठरले होते.  त्यानंतर दिनेश कापकर यांनी प्रशांत ताटे उर्फ राजेंद्र चौधरी याच्या फोन पे अकाऊंटवर वेळोवेळी करून ६० हजार रूपये पाठविले होते. कापकर यांनी संपर्क करून विचारले असता ताटे याने मटेरियल पाठविले असल्याचे सांगितले. परंतु मटेरियल न मिळाल्याने कापकर यांनी पुन्हा ताटे यांच्याशी संपर्क केला असता, ताटे त्यांना उडवा-उडवीची उत्तरे देत होता, तसेच पैसे देण्यास टाळाटाळ करीत होता.

आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर कापकर यांनी प्रशांत ताटेबाबत चौकशी केली असता त्याचे नाव राजेंद्र चौधरी असल्याचे समोर आले. याप्रकरणी दिनेश कापकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत ताटे उर्फ राजेंद्र चौधरी  याच्याविरूध्द सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like