ईएसआयसी हॉस्पिटल नूतनीकरणासाठी 40 कोटी निधी मंजूर- खासदार संजय मंडलिक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूरातील 100 बेडच्या ‘ईएसआयसी’ हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी 40 कोटी निधी मंजूर केला आहे. पुणे विभागातील पहिले औषध सेवा सेतू केंद्र या हॉस्पिटलमध्ये सुरू झाले आहे. लवकरच जिल्ह्यातील एमआयडीसीमध्ये 3 डॉक्टर डिस्पेन्सरी होणार असल्याची माहिती खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी दिली.

ताराबाई पार्क येथील ईएसआयसी हॉस्पिटलमध्ये बुधवारी सेवा सेतू केंद्राचे उद्घाटन खासदार मंडलिक यांच्या हस्ते झाले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी इएसआयसीचे विभागीय अधिकारी प्रणय सिन्हा होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, वैद्यकीय अधिक्षक काजल गोलदार, हेमंत पांडे, विज्ञान मुंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ईएसआयसी पेन्शनच्या लाभार्थीचा सत्कार करण्यात आला. हॉस्पिटल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

खासदार मंडलिक म्हणाले, कोल्हापुरातील ईएसआयसी हॉस्पिटलच्या नूतनीकरणासाठी केंद्राने 40 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे औद्योगिक घटकाशी निगडीत असलेला हा प्रश्न निकालात निघाला आहे. सुमारे 5 लाख लोकांना याद्वारे चांगले उपचार मिळणार आहेत. हॉस्पिटलमध्ये सहा अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, अतिदक्षता विभाग, त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. केंद्रीय लोकनिर्माण विभागामार्फत याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. पर्यावरणपुरक उपाययोजना यामध्ये करण्यात आल्या आहेत. ईटीपी, सौरऊर्जा प्रकल्प, सांडपाण्याचा पुनर्वापर येथे होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाला पुनर्जिवित केले आहे. त्यासाठी यंदा 10 कोटींचा निधी मंजूर केला आहे. बाहय़रूग्ण विभागाच्या माध्यमातून हॉस्पिटल सुरू आहे. तेथे आता अत्याधुनिक हेमॅटोलॉजी लॅब, 15 बेंडचे दोन वॉर्ड, प्रशासकीय विभाग सुरू झाले आहेत. लाभार्थीच्या प्रलंबित बिलांची प्रक्रिया लवकर होण्यासाठी डिस्पेंन्सरी कम ब्रँच ऑफीस सुरू केले आहे. आता सेतू सेवा कार्यालय सुरू झाले. पुणे विभागातील ते पहिलेच आहे. औद्योगिक एमआयडीसीमध्ये तीन डॉक्टर डिस्पेन्सरी लवकरच होणार आहेत. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले.

विभागीय निदेशक सिन्हा म्हणाले, ईएसआयसी हॉस्पिटलच्या 68 व्या वर्धापन दिनी 24 फेब्रुवारीपासून 10 मार्चपर्यत कोल्हापुरात 12 ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यात येत आहेत. या विशेष सेवा पंधरवडय़ात कामगारांचे बिलासंदर्भातील प्रश्न सोडवले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक काजल गोल्डदार यांनी स्वागत केले. राजेंद्र शिखरे यांनी आभार मानले. यावेळी हेमंत पांडे, चंद्रशेखर पांडे, सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, श्रावणी अकोलकर, सुरज यादव, हृषिकेश पत्की, राजेंद्र शिखरे, ललीत गांधी, सचिन राणे, राजेश कुमार, सुरेश पाटील, आप्पासो मिसाळ यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment