Sunday, May 28, 2023

“आजही रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज” – डाॅ.अविनाश भारती

हॅलो महाराष्ट्र  | परभणी प्रतिनिधी

भारताच्या इतिहासात अनेक राजे-महाराजे होऊन गेले. परंतु आजही रयतेच्या मनावर राज्य करणारे राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे आहेत. जिजाऊमासाहेबांच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केले. त्यांचा इतिहास केवळ वाचल्याने चालणार नाही,तर त्यांच्या विचारांचे आचरण विशेषतः तरुण पिढीने केले पाहिजे, शिवजयंतीच्या निमित्ताने मनाशी निर्धार करावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे, स्त्रियांचा आदर व सन्मान हा शिवरायाच्या स्वराज्याचा कणा होता, स्त्रियांशी झालेले गैरवर्तन त्यांनी कधीही खपवून घेतले नाही प्रसंगी स्वकीयांना सुद्धा कठोर शिक्षा दिली.

शेतकऱ्यांची मुलं स्वराज्यासाठी आपला प्राण तळहातावर घेवून उभे होते,याचं कारण म्हणजे शिवरायांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेले हिताचे कायदे हे होते. शेतकऱ्यांच्या पिकाच्या मोडाला साधे नुकसान जरी पोहोचले तरी त्याची गय केली जाणार नाही असे फर्माण त्यांनी काढले होते. शिवाजी महाराज कुणा एका जातीपातीचे किंवा कोणा एका धर्मीयांसाठी नव्हते तर त्यांनी अठरापगड जाती धर्माला सोबत घेऊन त्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. अविनाश भारती यांनी केले.

दिनांक 19 फेब्रुवारी 2022 शनिवार रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या शिवजन्मोत्सवात व्याख्याते म्हणून ते उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य मा. आ. बाबाजानी दुर्रानी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते मुंजाजीराव भाले पाटील, अनिलभाऊ नखाते (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी) सुभाष आबा कोल्हे (मा. सभापती जि. प. परभणी), दादासाहेब टेंगसे (मा. सभापती जि. प. परभणी), एकनाथराव शिंदे (उपसभापती,कृषी उत्पन्न बाजार समिती, पाथरी), दत्तराव मायंदळे( संचालक, परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक), राजेश ढगे (मा.उपसभापती,पंचायत समिती पाथरी) राजीवजी पामे,अलोक चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी संचालक माधवराव जोगदंड, नारायणराव आढाव, लहूराव घांडगे, अशोकराव गिराम, दगडोबा दुगाणे आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराज यांची जयंती ही सर्व जातीधर्मातील लोक एकत्रित बोलावून मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याचा मानस आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी व्यक्त केला. महापुरुषांच्या जयंती निमित्त समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवावेत व कायद्याचे बंधन पाळून महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या कराव्यात. युवकांनी भारताचा इतिहास जरूर वाचला पाहिजे असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले.

कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सौ भावनाताई अनिलराव नखाते (अध्यक्षा, परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) , सौ शिवकन्याताई ढगे (मा. सभापती पंचायत समिती पाथरी) व आदी महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथराव शिंदे (उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,पाथरी) यांनी तर सूत्रसंचालन तुकाराम शेळके यांनी केले.