राज्यातील प्रत्येक नागरिकाने अन्नदात्याचे ऋण फेडण्यासाठी महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे; शिवसेनेचे आवाहन

sanjay raut
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या पुत्राने गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारल्याच्या घटनेविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी आज, ११ ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झाली असून आजच्या ‘सामना’मधून जास्तीत जास्त लोकांना अन्नदात्या शेतकऱ्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे.

लखीमपूर खेरीतील शेतकऱ्यांवरील हल्ला हा देशातील शेतकऱ्यांवरील हल्ला आहे. ‘जय जवान, जय किसान’ हा ज्या देशाचा आत्मा आहे, तो आत्माच नष्ट करण्याचा हा प्रकार आहे. दोन वर्षांपासून तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी संघर्ष करतो आहे. गाझीपूरच्या सीमेवर तो ऊन, वारा, पावसात बसला आहे. या काळात चारशेवर आंदोलक शेतकऱ्यांचे बलिदान झाले. या सगळ्यांवर कडी म्हणजे लखीमपूर खेरीची भयंकर घटना.

लखीमपूर खेरी भागाचे खासदार अजय मिश्रा हे आज केंद्रात गृहराज्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या मतदारसंघात नऊ साखर कारखाने आहेत. त्या कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसेच बुडवले तेव्हा गरीब शेतकरी भाजप खासदारांच्या दारात उभे राहिले. शेतकऱ्यांचे काहीएक ऐकून न घेता उलट शेतकऱ्यांनाच धमकावले गेले. तरीही शेतकरी आंदोलनास उतरला, तेव्हा मंत्रिपुत्राने त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना ठार केले.असे शिवसेनेने म्हंटल.

कोरोना काळात धार्मिक उत्सव, सण साजरे करण्यावर कठोर निर्बंध सुरू आहेत, पण शेतकऱ्यांवरील अन्यायावर कोणतेच निर्बंध दिसत नाहीत. बेबंद, बेफामपणे शेतकऱ्यांना चिरडणे-भरडणे आणि ठार मारणे सुरूच आहे. हा जुलूम आहे, दडपशाही आहे. लखीमपूर खेरीत मंत्रिपुत्राने चार शेतकऱ्यांना चिरडून मारले.

या निर्घृण हत्येचा साधा निषेध केंद्रातल्या मोदी सरकारने केला नाही. उलट शेतकऱ्यांना ठार करणाऱ्या गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न केला. याविरोधात देशभरात संतापाच्या ठिणग्या उडत आहेत. लोकांच्या संतापाला वाट मोकळी करून देण्यासाठी राज्यातील महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकार केला आहे, शेतकऱ्यांच्या सांडलेल्या रक्ताला, बलिदानाला मानवंदना देण्यासाठीच या बंदचा पुकारा आहे. त्यामुळे इतर राज्यांनीही या बंदचे अनुकरण केलेच पाहिजे असे शिवसेनेनं म्हंटल.