विशेष प्रतिनिधी । संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत कोसळणाऱ्या पावसामुळे निवडणूक यंत्रणांना रविवारी दिवसभर तारेवरची कसरत करावी लागली. राज्यातील ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे. राज्य विधानसभेच्या २८८ जागा तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, राज्यात ९५,४७३ मुख्य तर १,१८८ सहाय्यक अशी एकूण ९६ हजार ६६१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. चार कोटी ६८ लाख ७५ हजार, ७५० पुरुष तर चार कोटी २८ लाख ४३ हजार ६३५ असे एकूण आठ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी दोन हजार ६३४ तृतीयपंथी, तीन लाख ९६ हजार अपंग आणि एक लाख १७ हजार ५८१ सर्व्हिस मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
मतदारांच्या सोयीसाठी यावेळी शक्यतो तळमजला किंवा पहिल्या मजल्यापर्यंत मतदान केंद्रे ठेवण्यात आली आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन मैदान मोकळ्या जागेवर किंवा मैदानात तयार करण्यात आलेली पाच हजार ४०० मतदान केंद्र वॉटरप्रूफ बनविण्यात आली आहेत. मतदानासाठी एक लाख ७९ हजार ८९५ मतदान यंत्रे (बॅलेट युनिट) आणि एक लाख २६ हजार ५०५ नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख ३५ हजार २१ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑड्रिटेल) यंत्रे पुरवण्यात आली आहेत.