औरंगाबाद प्रतिनिधी | चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा झटका सहन होत नाही असेच चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. मी सबंध आयुष्य शिवसेनेच्या कामासाठी खर्च केले आहे. हा पराभव पाहण्या आधी मला मरण का आले नाही असे भावनिक उद्गार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
आयुष्यातील शेवटची निवडणूक म्हणून या निवडणुकीकडे मी बघत होतो. या खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर मी देशभर शिवसेनेचा प्रचारक म्हणून फिरणार होतो. तसे मी उद्धव ठाकरे यांना बोललो देखील होतो. मात्र या निवडणुकीत झालेला पराभव हा सहन न होणार असाच आहे. त्यामुळे हा पराभव बघण्याआधी मला मरण का आले नाही असे चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.
चंद्रकांत खैरे हे १९९९ पासून २०१४ पर्यंत सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. त्यांनी हिंदुत्वाच्या जोरावर आणि शिवसेनेच्या कुशल संघटनांच्या जोरावर या निवडणुका जिंकल्या आहेत. मात्र यावेळी त्यांना वंचितचे इम्तियाज जलील आणि अपक्ष हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. या विरोधात खैरे यांचा पराभव झाला आहे. तर मतविभाजनाच्या फायद्यात इम्तियाज जलील हे येथे निवडणूक जिंकले आहेत.