महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेल खुदाई करणे धनिकास महागात पडले, मशिनरीसह वाहने जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

महाबळेश्वर पर्यावरणाच्या दृष्टीने अतिसंवेदनशिल असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात बोअरवेल खुदाई करणे माचुतर येथील एका धनिकास चांगलेच महागात पडले आहे. खुदाईसाठी वापरण्यात येणारे दोन मोठी मशिनरी असलेली वाहने महसुल विभागाने जप्त करून संबधितांवर येथील पोलिस ठाण्यात पर्यावरण सुरक्षा कायदा 1986 चे कलम 15 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

महाबळेश्वर पासुन सात कि.मी अंतरावर असलेल्या माचुतर येथील प्रदिप सतन शहा यांच्या सर्व्हे नं 48 चा 14 व ग्रामपंचायत मिळकत क्र. 90 मध्ये विनापरवाना बोअर खुदाई करण्यात येत असल्याची माहीती माचुतरचे तलाठी अविनाश शेडोळकर यांना समजली. त्यांनी माचुतरचे ग्रामसेवक वनिता इंगळे यांना बरोबर घेवुन संबंधित मिळकती मध्ये पाहणी केली असता बोअरवेल साठी उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्या ठिकाणी असलेल्या संबंधितांना परवाना बाबत चौकशी केली असता त्यांनी बोअरवेल खुदाई करण्याचा परवाना नसल्याचे सांगितले.

त्यानंतर तलाठी यांनी माचुतरचे सरपंच सुरेश कोंडीबा शिंदे पाटील व विजय विठ्ठ्ल शिंदे यांना बोलावुन घेतले व त्यांच्या समक्ष बोअर उत्खनन याचा पंचनामा केला. त्या नंतर तलाठी शेडोळकर यांनी बोअरखुदाई साठी वापरण्यात येणारे मशिनरी सह दोन वाहने जप्त करून ती तहसिलदार कार्यालयात उभी केली आहेत. दरम्यान संबंधितांनी पर्यावरण कायदयाचे उल्लंघन केल्या प्रकरणी तलाठी यांनी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात पंचनामा सादर करून संबंधितां विरोधात तक्रार दाखल केली.

तलाठी यांनी दाखल केलेल्या तक्रारी नुसार महाबळेश्वर पोलिसांनी बोअरवेल खुदाई करणारे मिळकत धारक प्रदिप शहा यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण कायदया नुसार गुन्हा दाखल केला आहे. परवाना असल्या शिवाय बोअर खुदाई करू नये असे आदेश बोअर खुदाई करणारे मशिन असलेले वाहन धारकांना दिले असतानाही हे वाहन धारक विनापरवाना बोअर खुदाई करतात अशा वाहन धारकांवरही गुन्हा दाखल करण्यात आला पाहीजे अशी मागणी शहरातुन होत आहे. तसेच तलाठी अविनाश शेडोळकर यांनी जागरुकता दाखवून धाडसी कारवाई केल्याने सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

Leave a Comment