औरंगाबाद – मतदार संघातील विकास कामाचा निधी देण्यासाठी जि. प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी 5 टक्के कमिशन मागितल्याचा खळबळजनक आरोप खा. इम्तियाज जलील यांनी केला. याविषयी त्यांनी ट्विटर या समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून असा उघड भ्रष्टाचार कधीच पाहिला नसल्याचे नमूद केले.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी सध्या वार्षिक नियोजन करण्यात व्यग्र आहेत. गतवर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेला निधी 31 मार्च अखेरपर्यंत खर्च करणे जि. प.ला बंधनकारक आहे. शिवाय यावर्षी जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेले सुमारे 158 कोटी आणि 15 व्या आयोगाचा निधी तसेच जि. प. उपकराचा निधी विकास कामावर खर्च करण्याचे नियोजन पदाधिकारी करीत आहेत. जिल्ह्यातील खासदार, आमदारांनी मतदारसंघातील विकास कामासाठी जि. प.कडे निधीची मागणी केली आहे. जि. प. ला मंजूर निधीच्या खर्चाचे नियोजन करण्याचे अधिकार जि.प. पदाधिकाऱ्यांना आहेत. यामुळे खासदार, आमदारांना निधी देण्यात येऊ नये, असा सूर काही पदाधिकाऱ्यांमध्ये होता. तत्पूर्वी अन्य लोकप्रतिनिधींप्रमाणे खा. इम्तियाज जलील यांनीही मतदारसंघातील विकास कामे करण्यासाठी जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे यांना पत्र देऊन निधीची मागणी केली होती.
दरम्यान, खा. जलील यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून मुख्यमंत्री कार्यालय आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टॅग करून एक पोस्ट सोमवारी रात्री अपलोड केली. त्यांनी जि. प.तील भ्रष्टाचारावर नियंत्रण आणण्याची विनंती केली. माझ्या मतदारसंघासाठी विकास निधी देण्यासाठी बांधकाम सभापती बलांडे 5 टक्के मागत आहेत. असे उघड भ्रष्ट व्यवहार कधीच पाहिलेले नाहीत. कृपया हे थांबवा, असे नमूद केले. खा. जलील यांच्या या पोस्टने खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेतील निधी वाटपाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी –
रस्ते विकासासाठी साडेआठ कोटींच्या निधीचे जि.प.कडे प्रस्ताव दिले होते. पालकमंत्र्यांनी निधी वाटपाची यादी अंतिम केल्याचे सांगून सभापती बलांडेंनी 50 लाख रुपये दिल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर माझ्या माणसाकडे 5 टक्के कमिशन मागितले. याबाबत मी बलांडेंना फोन केला असता त्यांनी माझ्याकडेही कमिशन मागितले. खासदारांकडे कमिशन मागण्याची हिंमत कशी होते. याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. या निधी वाटपाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. – इम्तियाज जलील, खासदार