शिराळा प्रतिनिधी | आनंदा सुतार
शिराळा तालुक्यातील कापरी येथील एका फार्म हाऊसमध्ये मडकी, पोते व पिशवीमध्ये ठेवलेले 19 जिवंत नाग सापडले. वनविभागाने कारवाई करत जप्त केलेले जिवंत नाग नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. याबाबत अज्ञातां विरोधात वन विभागाकडून गुन्हा दाखल झाला आहे.
निनावी दूरध्वनी वरून वन विभागाच्या 1926 हेल्पलाईन वर जिवंत नाग बंदिस्त करुन ठेवले असून, त्याचे प्रदर्शन होणार असलेची खबर मिळाली होती. हा फोन आल्याने शिराळा येथील वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक व वनमजूर तसेच सांगली येथील वनविभागाचे फिरते पथक व मानद सचिव रक्षक पथकाने सदरची कारवाई केली. फार्म हाऊसमध्ये ठेवलेले 19 नाग जप्त करुन या जप्त नागांची वैदयकीय तपासणी इस्लामपूर येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांचेमार्फत करण्यात आली आहे.
याबाबत वनविभागाने गुन्हा दाखल केला आहे. उपवनसंरक्षक विजय माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विजय गोसावी हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमी अतिशय साध्या पद्धतीने साजरी झाली होती. मात्र नागपंचमीच्या चौथ्या दिवशी सदर ठिकाणी जिवंत नाग कोठून व कसे आले याचा तपास सुरू झाला आहे. या कारवाईमुळे शिराळा शहरात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे.