खळबळजनक ! पाथरी आगारातील 130 कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री व राज्यपालांकडे इच्छामरणाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी |  महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट असल्याने एसटी महामंडळाकडून मिळणार्‍या तुटपुंज्या वेतनावर होणाऱ्या मानसिक त्रासामुळे परभणी जिल्ह्यातील पाथरी आगारात येणाऱ्या एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी टोकाची भूमिका घेत आत्महत्या सारखे विचार येत असल्याचे म्हणत इच्छामरणाची परवानगी द्यावी अशा मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पाथरी चे तहसीलदार यांच्यामार्फत 7 जानेवारी रोजी दिले आहे .यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे .

शुक्रवार 7 जानेवारी रोजी जिल्ह्यातील पाथरी आगारातील कर्मचाऱ्यांनी एकत्र येत दुपारी चारच्या सुमारास तहसीलदार सुमन मोरे यांची भेट घेत त्यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना इच्छामरणाचे पत्र पाठवले आहे .यामध्ये म्हटले आहे की, एस . टी . महामंडळातील सध्यस्थिती व कर्मचारी यांची मानसिक स्थिती योग्य राहिलेली नाही .आम्ही सतत तणावपूर्वक स्थितीत काम करत आहोत . महाराष्ट्रातील इतर शासकीय कर्मचारी यांच्या तुलनेत एस . टी . कर्मचारी यांची आर्थिक स्थिती अत्यंत वाईट आहे . एस . टी . महामंडळातील आम्हाला मिळणारे तुटपुंजे वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्या काही एस . टी . कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत . आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात परंतु आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करु शकत नाही. असे म्हणत निवेदनात पुढे म्हटले आहे की , वारंवार निवेदने देऊनही योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने आम्ही स्वेच्छा मरणाची परवानगी मागत आहोत .

सदरील स्वेच्छा मरणाची मागणी आम्ही स्वतः कोणत्याही दबावात न घेता करीत आहे . असे नमूद करत आम्ही आता या मानसिक सरकार कडून होणाऱ्या आर्थिक वागणूकीला वैतागलो आहोत असे म्हटले आहे. महाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने आपण एस . टी . महामंडळाला राज्य शासनात विलीन करुन राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतन श्रेणी देण्यात येवून आम्हाला आर्थिक व मानसिक त्रासातून मुक्त करावे व एस . टी . कर्मचाऱ्यांना जीवनदान द्या अथवा स्वेच्छा मरणाची परवानगी द्या अशी टोकाची भूमिका घेत मागणी केली आहे .

दिलेले स्वेच्छामरण निवेदनावर एकशे तीस कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षर्‍या आहेत .पाथरी बस आगारांमध्ये एकूण 318 एसटी कर्मचारी काम करतात .यामध्ये 123 चालक असून 120 वाहक आहेत  तर यांत्रिक कर्मचारी 43 व प्रशासकीय 32 कर्मचारी यांचा समावेश आहे .यातील 13 कर्मचारी यांना बडतर्फ केले असून 45 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, यापैकी 130 कर्मचारी यांनी मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे स्वेच्छामरणाची मागणी केली आहे .

Leave a Comment