औरंगाबाद – पैठण रोडवरील गेवराई येथील दुकान फोडल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका घरावर काळ दुपारी टाकलेल्या छाप्यात डिटोनेटर्स स्फोटकांचा साठा आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी बॉम्बशोधक आणि नाशक (बीडीडीएस) पथकासह तिकडे धाव घेतली. संशयित आरोपी फरार असून, त्याच्या शोधार्थ पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. जितेंद्र ऊर्फ जितूसिंग संतोषसिंग टाक (रा. अलाना कंपनीसमोर, गेवराई) , असे आरोपीचे नाव आहे.
याविषयी अधिक माहिती अशी कि, पैठण रोडवरील गेवराई येथील किराणा दुकान फोडून माल आणि रोख रक्कम चोरट्यांनी पळविली होती. त्यामुळे चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील आणि अन्य अधिकारी, कर्मचारी सोमवारी दुपारी घटनास्थळी गेले होते. दुकानात चोरी करणारे तीन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी त्यातील एक आरोपी जितूसिंग टाक असल्याचे ओळखले. टाक हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल चोर आहे. तो अलाना कंपनी परिसरातच राहतो. पोलिसांनी लगेच त्याचे घर गाठले, पण तो घरी नव्हता. पथकाने त्याच्या घरात चोरीचा माल मिळतो, का हे पाहण्यासाठी घर झडती घेण्यास सुरुवात केली. झडतीत तेथे १२६ डिटोनेटर्स (स्फोटके) आणि वायर, कैची, चिमटा, स्क्रू ड्रायवर आढळले. एवढ्या मोठ्या संख्येने डिटोनेटर्स आढळल्याने खळबळ उडाली.
या घटनेची माहिती तातडीने पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांना पोलिसांनी कळविली. पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाची पाहणी केली. बीडीडीएस पथकाच्या निगराणीखाली ही स्फोटके जप्त करण्यात आली. याप्रकरणी आरोपी जितूसिंगच्या विरोधात अवैध स्फोटके बाळगल्याचा गुन्हा चिकलठाणा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंदविण्यात आला.