खळबळजनक ! विद्यापीठात पीएचडी शोधनिबंधावर सही करण्यासाठी पैशांची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – मागिल महिन्याभरापासून मराठवाड्यातील शिक्षणाचे माहेरघर समजले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ना कोणत्या कारणामुळे राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे यांचे प्रकरण असो किंवा सहाय्यक उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांचे प्रकरण असो, ही दोन्ही प्रकरणे ताजी असतानाच आता पीएचडी शोध निबंधावर सही करण्यासाठी एका परदेशातील संशोधकाला गाईड कडून पैशाची मागणी करण्याचा धक्कादायक प्रकार विद्यापीठात उघडकीस आला आहे. यामुळे विद्येच्या पिठामध्ये शिक्षणाचा बाजार सुरू असल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील विद्यापीठाची नाहक बदनामी होत आहे.

पीएचडी थेसिस वर सह्या करण्यासाठी पैशांची मागणी केल्या प्रकरणी गाईडशीप गमावणाऱ्या विद्यापीठाच्या इंग्रजी विभागप्रमुख डॉ. गीता पाटील कडून पुन्हा एकदा पैशांची मागणी केल्याप्रकरणी येमेनी विद्यार्थी मो.अब्दुल्ला अलमसुदी याने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच या विद्यार्थ्याने फॉरेन ॲम्बेसीकडे लेखी तक्रार केली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यापीठाची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी देखील मागासवर्गीय विद्यार्थ्याला प्रवेश नाकारणे, परदेशी विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्रावर खाडाखोड करणे, संशोधक विद्यार्थ्यांना पैशांची मागणी करणे असे प्रकार समोर आल्याने त्यांची गाईडशीप रद्द करून विभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. गीता पाटील यांची गाईडशीप रद्द केल्यानंतरही त्या पीएचडी आणि एमफीलच्या मौखिक परीक्षा समिती RRC च्या चेअरमन आहेत. याचा गैरफायदा घेत संशोधक विद्यार्थ्यांचा छळ करण्याचा सपाटा त्यांनी लावला आहे.

या तक्रारीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा विद्यापीठाच्या संशोधन प्रक्रिया वादात सापडली आहे. डॉ.गीता पाटील प्रमाणेच डॉ.भारत हंडीबाग, डॉ.रेणुका बडवणे यांच्यावर गाईडशीप रद्द करण्याची कारवाई करण्यात आलेली होती. येमेनी विद्यार्थ्याला गेल्या एक ते दीड वर्षापासून फायनल सिनॉप्सिस सबमिट करण्यासाठी दरवेळेस चुकीची वागणूक दिल्या जात आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याला पैशाची मागणी होत आहे. याच विद्यार्थ्यांने एक दोन महिन्यांपूर्वी फॉरेन ॲम्बेसीकडे सुद्धा तक्रार केलेली आहे. त्यांनी याची दखल घेऊन कुलगुरूंना पत्रव्यवहार केलेला आहे. परदेशी विद्यार्थ्यांची पदाचा व अधिकाराचा गैरवापर करून अश्या तऱ्हेने लूट केल्याने विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्थरावर बदनामी होत आहे. गीता पाटील ह्यांना विभागप्रमुख पदावरून तात्काळ हटवावे,पीएचडी आणि एमफीलच्या मौखिक परीक्षा समिती RRC च्या चेअरमन पदावरून हटविण्यात यावे यासाठी विद्यार्थी संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

लवकरात लवकर कारवाई करणार – कुलगुरू
यासर्व गैरप्रकाराविरोधात येमिनी विद्यार्थ्याने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्या कडे तक्रार केली असता, त्यांनी यावर लवकरात लवकर कारवाई करणार असल्याचे विद्यार्थ्याला सांगितले. परंतु नेमक्या किती दिवसात ते मात्र सांगितले नाही. यासर्व विषयांवर आम्ही कुलगुरूंची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी आम्हाला वेळ दिला नाही.

Leave a Comment