औरंगाबाद – औरंगाबाद जिल्ह्यातील तुर्काबाद खराडी गावात शेकडो लोकांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. भंडाऱ्याच्या कार्यक्रमातील जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज आहे. यामध्ये गावातील जवळपास 70 टक्के लोकांना विषबाधा झाली आहे. यामुळे गावात व परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादेतील तुर्काबाद खराडी येथे भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील सर्व लोकांना भोजनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, याच भंडाऱ्याच्या जेवणातून ग्रामस्थांना विषबाधा झाली आहे. विषबाधा होण्याचं कारण काय असावं ? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र, या विषबाधेत गावातील शेकडो लोकांची प्रकृती बिघडली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या विषबाधेमुळे गावातील तब्बल 70 टक्के लोकांची प्रकृती बिघडली आहे.
बाधित लोकांवर गावातच उपचार –
हा प्रकार माहिती होताच येथील आरोग्य प्रशासन सतर्क झालं आहे. आरोग्य विभागाचे पदाधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी तुर्काबाद खराडी गावाकडे धाव घेतली. आरोग्य विभागातील पथकाकडून गावातच बाधित लोकांवर उपचार करण्यात येत आहेत. अचानकपणे घडलेल्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सध्या प्रकृती बिघडलेल्या नागरिकांवर उपचार करणे सुरु आहे.