हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | परभणी प्रतिनिधी
परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील लाडनांद्रा येथे भैरवनाथाच्या बार्षिक यात्रेमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यावर कारवाई साठी गेलेल्या पाथरी पोलिसांच्या पथकावर स्थानिक अवैध धंदे चालक व यात्रेतील लोकांनी केलेल्या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह इतर पाच पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची घटना रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पाथरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाडनांद्रा येथे प्रतिवर्षी भैरवनाथाची यात्रा भरवली जाते. रविवार 3 एप्रिल रोजी संध्याकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांच्यासह पाच ते सहा इतर पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक या ठिकाणी पोहोचले होते. दरम्यान यात्रेमध्ये मोठ्याप्रमाणावर सोंगाट्या ( गुडगुडी ),तितली भवरा व खुला तमाशा अशाप्रकारे अवैध कार्यक्रम चालू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. या सर्व प्रकारावर कारवाई करत असताना स्थानिक अवैध धंदे चालक व यात्रेतील लोकांसोबत पोलिसांचा वाद झाला.
यानंतर सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास जमावाने पोलिसांवर दगडफेक केल्याची घटना झाल्याची माहिती मिळाली असून यामध्ये पाथरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह इतर पाच कर्मचारी जखमी असुन जखमी पोलिसांमध्ये पोलीस नामदार सुरेश कदम सुरेश वाघ पोलीस हवालदार स.जाफर व एम. मुजमुले यांचा समावेश आहे. दरम्यान जखमी पोलीस कर्मचाऱ्यांना परभणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.
घटनास्थळी पोलिस बंदोबस्त पाठवण्यात आला असून लाडनांद्रा येथील यात्रा कमिटी अध्यक्ष , सदस्यांसह गावातील प्रमुख व काही संशयितांना पाथरी पोलिस ठाण्यात आणण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी बातमी लिहीपर्यंत पाथरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.