औरंगाबाद : चक्कर येऊन पडल्याने जखमी झालेल्या पत्नीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.शवविच्छेदन प्रक्रिया सुरू झाली.मात्र त्याचवेळी रुग्णवाहिका आणतो म्हणून पतीने घाटी रुग्णालयातून पोबारा केला. ही घटना बुधवारी घडली. दोन दिवसांपासून विवाहितेचे प्रेत नातेवाईकांच्या प्रतीक्षेत असून सिडको पोलीस त्यांचा शोध घेत आहे. संगीताबाई संदीप जैस्वाल असे मृत महिलेचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सोमवार रोजी रात्री सव्वा अकराच्या सुमारास संगीता या सिडकोतील कॅनॉटगार्डनकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एसबीआय बँके जवळ अचानक चक्कर येऊन पडल्या. दगडावर पडल्याने त्यांच्या डोक्याला, तोंडाला गंभीर जखमा झाल्या होत्या.त्यांना पती संदीप हिरालाल जैस्वाल व त्यांची मैत्रीण मंदा मिसाळ या दोघांनी घाटी रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर घाटी रुग्णालयातील ट्रॉमा केअर वॉर्डात उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला.
मृत्यू बाबतची एम.एल.सी.प्राप्त होताच सिडको पोलिस बुधवारी शवविच्छेदन करिता घाटी रुग्णालयात दाखल झाले. बुधवारी शवविच्छेदनची कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून पती संदीप जैस्वाल यांनी सिडको पोलिसांना रुग्णवाहिका घेऊन येत असल्याची थाप मारली आणि घाटी रुग्णालयातून पळ काढला. बराच वेळ होऊन देखील जैस्वाल परत न आल्याने पोलिसांनी परिसरात व मुकुंदवाडी भागात जैस्वाल यांचा शोध घेतला मात्र ते मिळून आले नाही. त्यांचा मोबाईल ही बंद आहे.
पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह घाटी रुग्णालयातील शीतगृहात ठेवले आहे. डोक्याला मार लागल्याने संगीता यांचा मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे त्या नंतर या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत संगीता यांचे नातेवाईक मिळून आल्यास सिडको पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
संदीप जैस्वाल हा संगीताचा दुसरा पती आहे. पहिल्या पती पासून सांगिताला चार मुले आहेत.ती चारही मुले शहरातील इन-१२ येथील वसतिगृहात आहेत.तर जैस्वाल पासून एक मुलगा आहे. मृत संगीता आणि तिचा पती संदीप या दोघांनाही दारूचे प्रचंड व्यसन होते.ज्या दिवशी संगीता चक्कर येऊन पडल्या त्या दिवशी देखील संगीताने दारू प्राशन केली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.अति मधसेवनाने सांगितला चक्कर आली असावी अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे.