वाकुर्डे योजनेचे थकीत वीजबिल कृष्णा कारखान्याकडून अदा

४ लाख २९ हजार ७३२ रूपयांचा चेक वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

उंडाळे विभागातील अनेक शेतकरी वाकुर्डे योजनेच्या पाण्यावर अवलंबून आहेत. पण या योजनेच्या वीजबिलाची रक्कम अनेक काळ थकीत असल्याने त्यांना या पाण्यापासून वंचित राहावे लागत होते. अशावेळी या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कृष्णा कारखान्याने पुढाकार घेत, थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार उर्वरित थकीत वीजबिलापोटी ४ लाख २९ हजार ७३२ रूपयांचा चेक आज पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला. या थकीत वीजबिलापोटी कृष्णा कारखान्याने आजअखेर १५ लाख ८० हजार ५५४ रूपये भरत, या भागातील शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

कराड तालुक्यातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण या योजनेचे वीज बिल थकीत असल्याने २०१८ साली या भागातील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. वीज बिलाची थकीत रक्कम जास्त असल्याने शेतकर्‍यांना ही रक्कम भरणे शक्य होणार नाही. त्यामुळे वाकुर्डे योजनेच्या थकीत वीज बिलाबाबत योग्य तोडगा काढावा, अशी मागणी कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर करून, त्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू ठेवला होता.

दरम्यान, शेतकर्‍यांचे हीत लक्षात घेऊन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी थकीत वीजबिलाची रक्कम भरण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याने, या भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ८ लाख १९ हजार रूपये, तसेच दुसऱ्या टप्पात ३ लाख ३१ हजार ९२२ रूपये भरले होते. यापैकी उर्वरित ४ लाख २९ हजार ७३२ रूपयांचा चेक आज पेठ नाका (ता. वाळवा) येथील वाकुर्डे योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

याप्रसंगी कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, धोंडिराम जाधव, कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष पंजाबराव पाटील, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील, बंटी जाधव, सेक्रेटरी मुकेश पवार, हंबीरराव पाटील, पंकज पाटील आदी उपस्थित होते.

You might also like