सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
राज्य शासनाने बैलगाडा शर्यतीस परवानगी दिल्याने पशु पालकांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. यामुळेच कवठे (ता. वाई) येथील कवठे बागड यात्रा मित्रमंडळ व कवठे पशुपालकप्रेमी यांच्या वतीने प्राथमिक शाळा कवठे येथे देशी गायींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये दाती गट व आदत गट अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. दोन्ही गटातून पहिले तीन क्रमांक व उत्तेजनार्थ दोन क्रमांक काढण्यात आले.
यामध्ये 1 ते 3 क्रमांकासाठी अनुक्रमे 3000 रुपये, 2000 रुपये व 1000 रुपये व उत्तेजनार्थ 2 असे दोन्ही गटांतून 10 उत्तम प्रतीच्या गायींच्या निवडी करण्यात आल्या. या प्रदर्शनामध्ये कवठे परिसरातील 57 गायींनी व त्यांच्या कालवडी यांनी सहभाग नोंदविला होता. वाई तालुक्यातील किंबहुना जिल्ह्यातील देशी गायींचे हे पहिलेच प्रदर्शन असल्याने हे पाहण्यासाठी कवठे परिसरातील पशुपालकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यामध्ये मोठ्या गटातून अनुक्रमे अनिकेत पोळ, गिरीश भागवत, किरण चव्हाण, स्वप्नील शिंदे व सुशांत करपे यांच्या गायीना तर आदत गटातून अनुक्रमे अमोल पोळ, शरद घाडगे, मंगेश पोळ, उदय यादव व संदीप सदाशिव पोळ यांच्या गायींना 1 ते 3 व उत्तेजनार्थ 2 असे क्रमांक देण्यात आले. या प्रदर्शनामध्ये देशी गायींच्या उत्तम निवडीसाठी वाई पशुचिकित्सालय सहाय्यक आयुक्त डॉ. स. भा. नालबंद, बोरगावचे पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास महाजन, डॉ. अविनाश राऊत, डॉ. सचिन हगवणे, डॉ. बिपीन खरात, डॉ. सुनील इरनक, डॉ. कांगळे, डॉ. राजेंद्र पार्टे आदी उपस्थित होते.